भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी निकालाची चिंता न करता सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची मुभा दिल्याने टी-20 वर्ल्डकप जिंकू शकलो असं म्हटलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. 2007 नंतर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केली. यासह रोहितने टी-20 मधून निवृत्ती जाहीर करताना विजयासह आपली कारकिर्द संपवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"या संघात बदल घडवून आणणे आणि आकडेवारी, निकालांची फारशी चिंता न करणे, तसंच असं वातावरण तयार करणं जिथे लोक जास्त विचार न करता मुक्तपणे खेळू शकतील हे माझं स्वप्न होतं," असं रोहित शर्माने CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आल्यानंतर म्हटलं.


"याचीच नेमकी गरज होती. मला माझ्या तीन आधारस्तंभांकडून फार मदत मिळाली. ज्यामध्ये जय शाह, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांचा समावेश आहे," अशा भावना रोहित शर्माने मांडला. पुढे तो म्हणाला “मी जे केलं ते करणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. तसंच खेळाडूंना विसरू नका, जे वेगवेगळ्या वेळी आले आणि आम्ही जे साध्य केले ते साध्य करण्यात संघाला मदत केली”. 


रोहित शर्माने यावेळी आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवत मिळवलेला हा विजय शब्दांत मांडू शकत नाही असं म्हटलं आहे. "ही भावना रोज अनुभवता येत नाही. आम्ही याची फार अपेक्षा करत होतो. जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकलो तेव्हा आम्ही त्या क्षणाचा आनंद घेणं महत्त्वाचं होतं. संपूर्ण देशाने आमच्यासह सेलिब्रेशन केल्याबद्दल आम्ही आभार आहोत," असं रोहित शर्मा म्हणाला.


"आमच्यासाठी हा विजय जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो संपूर्ण देशासाठी होता. ट्रॉफी घरी आणणं आणि प्रत्येकासह त्याचा आनंद साजरा करणं हे फार मोठं होतं. ती एक विलक्षण भावना होती जी शब्दांत मांडू शकत नव्हतो. मला वाटत नाही की ही भावना व्यक्त करता येईल," असं रोहित शर्माने सांगितलं. 


रोहित शर्माने यावेळी आपण बॅटचं किती वजन आहे याचा फारसा विचार करत नसल्याचं सांगितलं आहे. "जे लोक माझ्यासोबत चेंजिंग रूममध्ये वेळ घालवतात जेथे मी माझे स्टिकर्स लावतो आणि मी बॅटची टेप आणि ते सर्व ठेवतो, ते तुम्हाला सांगतील मी जी बॅट उचलतो त्याच्याने जाऊन खेळतो," असं रोहित म्हणाला.


“माझ्यासाठी बॅटचा समतोल खूप महत्त्वाचा आहे. मी अनेक फलंदाजांना पाहिलं आहे जे बॅटचं वजन किती? बाहेरुन कशी दिसते? याचा फार विचार करतात. पण मी त्यापैकी नाही. मी बॅट उचलल्यानंतर ती योग्य आहे का पाहतो आणि थेट जाऊन खेळतो," असं रोहितने सांगितलं.