बांगलादेशविरोधातील मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी दिलखुलास संवाद साधत आपल्यातील कथित वादाला पूर्णविराम दिला आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीदरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीरने आपल्या करिअरमधील काही महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये ऑस्ट्रेलियातील खेळीचाही समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि गौतम गंभीर नेहमीच मैदानावरील आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. यामधील काही क्षणी त्यांना हिरो तर काही क्षणी व्हिलन ठरवण्यात आलं. आयपीएलमध्ये तर विराट कोहली आणि गौतम गंभीर आपापसात भिडले होते. यामुळे त्यांच्यातील कथित वाद नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र आता विराट कोहली आणि गौतम गंभीर भारतीय संघात एकत्र असून त्यांच्यात अद्यापही वाद असल्याचे दावे केले जातात. मात्र या मुलाखतीमधून त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 


या मुलाखतीदरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानात विरोधी संघातील खेळाडूंसह होणाऱ्या भांडणांवरुन एकमेकांना डिवचताना दिसत आहेत. कोहलीनेच गंभीरला जेव्हा तो मैदानावर एखाद्या खेळाडूशी वाद घालतो, तेव्हा कोणत्या झोनमध्ये जातो त्याबद्दल विचारलं. पण, यावर गौतम गंभीरने दिलेल्या उत्तरानंतर त्याला हसू अनावर झालं. 



"जेव्हा तू फलंदाजी करत असतोस आणि विरोधी संघातील खेळाडूंशी वाद होतो तेव्हा यामुळे आपली लय बिघडू शकते आणि आपण बाद होऊ शकतो असं कधी तुला वाटलं का? किंवा तुला त्यामुळे प्रेरणा मिळायची?," असा प्रश्न विराट कोहलीने विचारला. त्यावर गौतम गंभीर म्हणतो की, "माझ्यापेक्षा जास्त तर तुझी भांडणं झाली आहेत. मला वाटतं माझ्यापेक्षा तू या प्रश्नाचं जास्त चांगलं उत्तर देऊ शकतोस".


त्यावर विराट कोहली म्हणतो की, "मी तर माझ्याशी कोणीतरी सहमत व्हावं हे शोधतोय. हे चुकीचं आहे असं सांगत नाही. कोणीतरी म्हणावं हो, असचं होतं". यावेळी विराट कोहलीने आम्ही सर्व मसाल्यांना (चर्चांना) पूर्णविराम देत आहोत असं म्हणताच गौतम गंभीरलाही हसू अनावर झालं. ही चर्चेची चांगली सुरुवात आहे असं तो म्हणतो.


विराट कोहली आणि गौतम गंभीरने 2011 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये मोलाची कामगिरी केली होती. आता भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी असून विराट कोहली त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.