पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय क्रिकेट टीम ही सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनिल सुब्रमण्यम पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सुनिल सुब्रमण्यम यांनी गैरवर्तणूक केल्याची बातमी आता समोर येत आहे. कॅरेबियन देशांमध्ये जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी भारतीय उच्चायोगानं सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क करावा, असं बीसीसीआयने सांगितलं होतं. यानंतर त्रिनिदाद एण्ड टोबॅगोमध्ये असलेल्या भारतीय उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांनी सुब्रमण्यम यांना संपर्क केला, पण सुब्रमण्यम यांनी अधिकाऱ्यांना महत्त्व दिलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी २०१८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीही सुनिल सुब्रमण्यम बेजबाबदार वागण्यामुळे चर्चेत आले होते. याआधी सुब्रमण्यम यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही वेळ ओढावल्याचं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. यावेळी उच्चायोगाच्याबाबतीत ही गोष्ट घडली नसती आणि प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय अडचणीत आले नसते, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या या अधिकाऱ्याने दिली.


'याआधीही अशा घटना घडल्या, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळेच त्यांचं धारिष्ट्य झालं. आता विनोद राय यांच्यापर्यंत गोष्टी गेल्यामुळे सुब्रमण्यम यांच्यावर कारवाई होऊ शकते,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


'ज्यांनी कोणी टीम व्यवस्थापक सुब्रमण्यम यांच्याही बोलणं केलं, ते सुब्रमण्यम यांच्या वर्तणुकीमुळे निराश झाले. आपल्या मित्रांसाठी तिकीट आणि पास मिळवणं हीच त्यांची प्राथमिकता आहे. आपल्या पदाची जबाबदारी पार पाडणं हे त्यांच्यासाठी नंतर येतं,' अशी टीकाही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केली.