`तुझी आता गरज नाही,` रोहित शर्माला BCCI ने स्पष्टच सांगितलं; विराटला म्हणाले `तुझं भविष्य..`
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सिडनीमधील पाचव्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मालिका गमवायची नसेल तर भारताला आक्रमक खेळी करत हा सामना जिंकण्याची गरज आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मासंबंधी मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार बहुतेक रोहित शर्माने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला आहे.
कसोटीमध्ये सध्या संघर्ष करणारा रोहित शर्मा आता निवड समितीच्या यादीत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्माचा विचार केला जाणार नाही. रिपोर्टनुसार, रोहित शर्मालादेखील हे कळवण्यात आलं आहे.
जून 2025 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारत जरी पात्र ठरला तरीही रोहित शर्मा कसोटी संघात पुनरागमन करेल अशी शक्यता नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी एकत्रितपणे रोहित शर्माला सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये रोहित शर्मा संघर्ष करताना दिसला. पहिल्या सामन्यात त्याने विश्रांती घेतली होती. उर्वरित तीन सामन्यात त्याने 3,6,10,3 आणि 9 इतक्या धावांची नोंद केली. सिडनीमध्ये नाणेफेकीच्या वेळी, भारताचा स्थायी कर्णधार जसप्रीत बुमराह म्हणाला, "साहजिकच, आमच्या कर्णधाराने (रोहित) त्याचे नेतृत्वही दाखवले आहे. त्याने या सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जे काही आहे ते संघाच्या भल्यासाठी आहे. आम्ही तेच करु पाहत आहोत".
निवड समिती चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भातही चर्चा करणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संपल्यानंतर संपूर्ण संघ भारतात परतल्यावर ही बैठक होणे अपेक्षित आहे.
विराट कोहलीशी निवड समिती चर्चा करणार
उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू खेळताना बाद झाला. अवघ्या 17 धावा करून कोहली तंबूत परतला. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावल्यानंतरही कोहली पुनरागमन केला आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहली सात वेळ जवळपास सारखाच बाद झाला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर निवडकर्ते विराट कोहलीसोबत त्याच्या भविष्याबाबतही चर्चा करणार आहेत.
तथापि, संघातील आणखी एक वरिष्ठ खेळाडू असणारा रवींद्र जडेजाला मात्र संघात कायम ठेवलं जाणार आहे.