मुंबई : भारतीय क्रिकेट संघात खऱ्या अर्थाने एक काळ गाजवणाऱ्या आणि संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. सध्याच्या घडीला धोनीने काही काळ स्वत:ला क्रिकेटच्या मैदानापासून दूर ठेवलं असतं तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बहुविध रुपांमध्ये सर्वांच्याच भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी कधी एकदा क्रिकेटच्या मैदानात परतणार, अशी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागलेली असतानाच त्याचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०१९च्या विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातून धोनीने त्याचं नाव मागे घेतलं तेव्हापासूनच तो क्रिकेटला रामराम ठोकणार अशा चर्चा रंगल्या होत्या. या साऱ्यामध्ये धोनी मात्र एखा खास कामात व्यग्र राहिला होता. लष्कराच्या एका खास तुकडीचा भाग असणाऱ्या धोनीने महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी यादरम्यानचा वेळ दिला होता. 


सोशल मीडियावर तेव्हा धोनीचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. बऱ्याच महिन्यांपूर्वीच्या या घटनेनंतर आता पुन्हा एकदा माहीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. यात तो एका जवानासोबत लष्करी गणवेशात दिसत आहे. हा त्याच प्रशिक्षणादरम्यानचा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे. 




धोनीच्या असंख्य चाहत्यांनी या फोटोला पसंती दिली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यादरम्यान माहिने लष्कराच्या खास तुकडीचं प्रशिक्षण घेतलं होतं. टेरिटोरियल आर्मी बटालियन (पॅराशूट) तुकडीसाठी त्याने गस्तही घातली होती. देशाप्रती आपली जबाबदारी आणि मानद स्वरुपात आपला झालेला बहुमान या गोष्टींचा मान राखत धोनीचे देशसेवेसाठीही एका अर्थी त्याचं योगदान दिलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.