`जर तुला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर...`, दिग्गजाने पृथ्वीला स्पष्टच सांगितलं होतं, `वयाच्या 23 व्या वर्षी 30-40 कोटी कमावले...`
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) करिअरमध्ये झालेली अधोगती यावर भाष्य केलं आहे. तसंच पैसा आणि प्रसिद्धीमुळे तो विचलित झाला असंही सांगितलं.
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला आयपीएलमध्ये एकही खरेदीदार न मिळाल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोहम्मद कैफनंतर आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे सह-मालक पार्थ जिंदाल यांच्यानंतर आता दिल्लीचे माजी प्रशिक्षक प्रवीम आमरे यांनी यावर भाष्य केलं आहे. पृथ्वी शॉ दिल्लीकडून खेळत असताना प्रवीण आमरे यांनी त्याला जवळून पाहिलं आहे. प्रवीण आमरे यांच्या मते पृथ्वी शॉ क्रिकेटमधून मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी यामुळे भरकटला.
पृथ्वी शॉने नुकतंच मुंबईतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे येथे पेंटहाऊस विकत घेतलं आहे. 2018 मध्ये त्याच्या नेतृत्वात अंडर-19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर तो प्रसिद्धीस आला होता. यानंतर त्याला आयपीएलमध्येही करारबद्ध करण्यात आल होतं. पण पृथ्वी जितक्या वेगाने यशाच्या पायऱ्या चढला, त्याच्या दुप्पट वेगाने खाली उतरत आहे. प्रवीण आमरे यांच्या मते पृथ्वी शॉ वाहवत निघून गेला, ज्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. पृथ्वी शॉला विनोद कांबळीचं उदाहरण देत काय करु नये हे सांगण्यात आलं होतं, पण त्याचा फायदा झाला नाही असं प्रवीण आमरे म्हणाले आहेत.
"तीन वर्षांपूर्वी मी त्याला विनोद कांबळीचं उदाहरण दिल होतं. मी विनोद कांबळीची अधोगती फार जवळून पाहिली आहे. या पिढीला काही गोष्टी शिकवणं सोपं नाही. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केलं हे त्याचं नशीब. 23 वर्षांचा असताना त्याने 30 ते 40 कोटी कमावले असतील. आयआयए पदवीधरालाही इतका पैसा मिळत असेल का? जेव्हा तुम्ही इतक्या कमी वयात पैसा कमावता तेव्हा भरकटण्याची शक्यता असते. पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्हाला माहिती हवं. चांगले मित्र असणं, क्रिकेटला प्राधान्य देणं गरजेचं आहे," असं प्रवीण आमरे यांनी सांगितलं.
2018 मध्ये, शॉने कसोटी पदार्पणात शतक झळकावलं आणि 2018/19 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळवलं होतं. पण त्या मालिकेतील एकही सामना खेळण्याआधीच, सामन्यादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली आणि तो बाहेर पडला. तिथून त्याची अधोगती सुरु झाली. 2020 च्या सुरुवातीला, बीसीसीआयने शॉला कफ सिरपमध्ये आढळणारा प्रतिबंधित पदार्थ टर्ब्युटालाईन पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आठ महिन्यांसाठी निलंबित केलं. यादरम्यान शिस्तभंगाची कारवाईही करण्यात आली. त्यावेळी सचिन तेंडुलकरनेही त्याच्याशी संवाद साधला होता.
"त्याच्यासारख्या चांगल्या खेळाडूची अधोगती पाहणं हे फार वाईट आहे. कोणीतरी मला सांगितले की सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीसाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी, पृथ्वीने क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सराव सामन्यात शानदार शतक ठोकले. आजही तो आयपीएलमध्ये 30 चेंडूत अर्धशतक ठोकू शकतो. कदाचित तो प्रसिद्धी आणि पैसा, आयपीएलचे दुष्परिणाम हाताळू शकला नाही. त्याचे उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेटमधील केस स्टडी असू शकते. त्याचं जे झालं आहे ते इतर क्रिकेटपटूंच्या बाबतीत घडू नये," असं प्रवीण आमरे म्हणाले.
"जेव्हा दिल्लीने त्याला विकत घेतलं, तेव्हा त्याने नुकतंच भारताच्या अंडर-19 संघाचं नेतृत्व करत कप जिंकला होता. त्याच्या प्रतिभेला पाठिंबा देणारा दिल्ली हा पहिला आयपीएल संघ होता. त्यावेळी 1.2 कोटी ही मोठी रक्कम होती. पुढच्या वर्षी, पहिल्याच सामन्यात त्याने कोलकाताविरुद्ध केवळ 55 चेंडूत 99 धावा केल्या. तरीही दिल्लीने त्याच्यावर सहा वर्षे विश्वास ठेवला. दिल्लीचं मॅनेजमेंट दुखावलं गेलं होतं,ज्यामुळे पृथ्वीच्या कामगिरीत अडथळा निर्माण झाला होता, "असं आमरे म्हणाले.
"व्यवस्थापनाने पाठिंबा दिला तेव्हा मीदेखील तिथे होते. बेशिस्तपणामुळे त्याला संघातून काढण्याचा निर्णय़ घेणाऱ्यांमध्ये मीदेखील होतो. ही शिक्षा नव्हती, तर तो योग्य मार्गावर येण्यासाठी प्रयत्न होता. तो हे सकारात्मकपणे घेईल आणि डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे. तो फक्त 25 वर्षांचा आहे, अजून त्याच्याकडे भरपूर वेळ आहे," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.