नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विराट कोहली याने RP-SG Indian Sports Honours हा पुरस्कार सोहळा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी हा पुरस्कार सोहळा पार पडणार होता. पण, पुलवामा हल्ल्याच्या धक्क्याने साऱ्या देशातून व्यक्त होणारी हळहळ पाहता शहीदांना आदरांजली म्हणून त्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने आपल्या ट्विटर हँडलवरुन या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला सलाम केला असून, या आव्हानात्मक प्रसंगात आपण जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं सांगितलं. Indian Sports Honours हा पुरस्कार विराट कोहली फाऊंडेशन आणि आरपी संजीव गोएंका सुमहाकडून आयोजित करण्यात येणारा पुरस्कार सोहळा आहे. 



फक्त विराटच नव्हे, तर भारतीय क्रीडाक्षेत्रातील इतरही खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि त्यातही आता झालेला हा हल्ला पाहता आता कठोर पावलं उचलली जाण्याची गरज असल्याच्याच प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. सोबतच शहीदांच्या कुटुंबासोबत या प्रसंगात आपण आधार म्हणून उभं असल्याची भावनाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. 


गुरुवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे जवानांच्या बसच्या ताफ्यावर स्फोटकांनी बरलेल्या कारने धडक देत हा हल्ला घडवून आणण्यात आला होता. आदिल दार नावाच्या फिदाईनने हा हल्ला घडवून आणला असून, जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवान शहीद झाले असून, साऱ्या देशावर शोककळा पसरली आहे.