भारतीय खेळाडूंच्या `आर्मी कॅप` प्रकरणावरुन पाकिस्तानला चपराक
क्रीडा क्षेत्रातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : सर्वच देशांनी पाकिस्तानविरोधी सूर आळवलेला असताना क्रीडा क्षेत्रातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच रांची येथे पार पडलेल्या एका क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघातील सर्व सदस्यांनी 'आर्मी कॅप' घालत सैन्यदलाप्रती असणारी आदराची भावना व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या वेळी भारतीय क्रिकेट संघाचा हा अंदाज पाहायला मिळाला. पाकिस्तानकडून मात्र त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. पण, बीसीसीआयने यासंबंधीची परवानगी घेतल्याचं स्पष्ट करत आयसीसीने पाकिस्तानच्या चपराक लगावली आहे, हे आता स्पष्ट होत आहे.
सैन्यदलाप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय क्रिकेट खेळाडूंनी 'आर्मी कॅप' घातल्याच्या एका दिवसानंतरच भारताच्या या भूमिकेमुळे खेळाला राजकारणाची किनार मिळत असल्यासंबंधीची विचारणा आयसीसीकडे करण्यात आली होती. पाकिस्तानच्या याच प्रश्नाचं उत्तर देत बीसीसीआयकडून याविषयी रितसर विनंती करत परवानगी घेण्यात आल्याचं आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं.
'बीसीसीआयने आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे खेळाडूंना आर्मी कॅप घालून खेळण्याविषयी विनंती केली होती. मदतनिधीच्या उपक्रमासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगत शहीद जवानांना त्या माध्यमातून आदरांजली देण्याची भूमिकाही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली होती', अशी माहिती आयसीसीच्या सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केली आहे.
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी 'आर्मी कॅप' घातली होती. शिवाय या दिवसाच्या सामन्यातून मिळणारी रक्कम ही खेळाडूंनी शहीदांच्या कुटुंबीयांना देत त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. पण, यावरच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारतीय खेळाडूंनी खेळादरम्यान नेहमीच्या कॅपऐवजी 'आर्मी कॅप' घातली हे आयसीसीने पाहिलं नाही का, असा खोचक प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानमधील माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. ज्याचं उत्तर आता त्यांना थेट आयसीसीकडूनच देण्यात आल्याचं कळत आहे.