भारताचा हा फास्ट बॉलर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता
टेस्ट क्रिकेटमधून लवकरच निवृत्त होणार हा फास्ट बॉलर
मुंबई : दुखापतीनंतर भुवनेश्वर कुमार (Bhavneshwar Kumar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. आयपीएलमध्ये (IPL 2021) हैदराबादकडून तो खेळत होता. आयसीसी टेस्ट चँपियनशिपच्या (ICC Test Championship) अंतिम सामन्यासाठी आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भुवीला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. भुवीची कसोटी संघात निवड न झाल्याने चर्चा देखील झाल्या. परंतु नंतर ही बातमी समोर आली की कसोटी सामन्यासाठी तो पूर्णपणे फिट नव्हता. मात्र, आता भुवीला टेस्ट क्रिकेटमध्ये रस नसल्याचं कळतं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भुवीला आता आपले सर्व लक्ष मर्यादित षटकांच्या सामन्यांवर केंद्रित करायचे आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक नाही. अलीकडील काळात त्याच्या वर्क ड्रिलमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि त्याचे निकटवर्तीयांना याची जाणीव आहे. याशिवाय तो बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेटच्या बाहेर आहे आणि व्हाईट बॉल क्रिकेटचा कम्फर्ट झोन आणि प्रशिक्षण हेदेखील या निर्णयामागचे एक मोठे कारण आहे.
भुवीने 2013 मध्ये भारतीय संघासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता, परंतु त्यानंतर त्याने देशासाठी केवळ 21 टेस्ट सामने खेळले आहेत. त्याने 21 कसोटी सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत आणि 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या तंदुरुस्तीवरही परिणाम झाला. भुवी कसोटी संघात नसला तरी श्रीलंका दौर्यासाठी त्याला वनडे आणि टी-20 संघात स्थान देण्यात येईल असे बोलले जात आहे.