मुंबई : बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) पुढील वर्षी होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधून (Commonwealth Games) भारतीय हॉकी संघाने (Hockey India) माघार घेतली आहे. हॉकी इंडियाने आज या निर्णयाची घोषणा केली. कोरोना प्रादुर्भाव (Coronavirus) आणि ब्रिटनमधील (Britain) 10 दिवसांच्या विलगीकरणाच्या (Quarantine) जाचक नियमांमुळे हॉकी इंडियाने हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने एक दिवस आधी हेच कारण देत भुवनेश्वर इथं होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली होती.


एशियन गेम्सला प्राधान्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान खेळवले जाणार आहेत. तर एशियन गेम्स (Asian Games) 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये केवळ 32 दिवसांचं अंतर आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये ब्रिटनचा समावेश आहे. अशा परिस्थितीत भारतीय हॉकी संघाला पाठवण्याची जोखीम हॉकी इंडिया घेऊ इच्छित नाही.


एशियन गेम्स 2022 ही पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic) पात्रता स्पर्धा आहे आणि एशियन गेम्सचं प्राधान्य लक्षात घेऊन, हॉकी इंडिया भारतीय हॉकी संघातील कोणत्याही खेळाडूला कोरोना संक्रमणाचा धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. यामुळे हॉकी इंडियाने पुरुष आणि महिला हॉकी संघाला कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 


ब्रिटनच्या भारतीय प्रवाशांसाठी जाचक अटी


ब्रिटनने अलीकडेच भारताच्या कोविड-19 लस प्रमाणपत्राला मान्यता देण्यास नकार दिला, लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 10 दिवसांचं विलगीकरण अनिवार्य केलं. आयओए अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात हा भेदभाव ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे, ज्यांनी राखीव संघांना खेळाच्या जागतिक प्रशासकीय मंडळाशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.


निर्बंध भेदभाव करणारे


अलीकडेच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेदरम्यानही भारतीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांना असे भेदभावपूर्ण निर्बंध लागू नव्हते. संपूर्ण लसीकरण झालेल्या खेळाडूंसाठी 10 दिवसांचं विलगीकरण त्यांच्या कामगिरीवर परिणाम शकतं, आम्हाला वाटते की हे निर्बंध भारताविरुद्ध भेदभाव करणारे आणि दुर्दैवी आहेत असं हॉकी इंडियाने म्हटलं आहे.