मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण भारतीय खेळाडू रेकॉर्डसाठी आणि स्वत:साठी खेळायचे असा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हकने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी खेळत होतो तेव्हा कागदावर भारतीय खेळाडूंची रेकॉर्ड चांगली होती. पण जेव्हा आम्ही ३०-४० रन जरी केल्या तरी त्या टीमसाठी असायच्या. भारतीय खेळाडू जेव्हा १०० रन करायचे, तेव्हा ते टीमसाठी नसायचे, तर स्वत:साठी असायचे. हाच आमच्यात आणि त्यांच्यात फरक होता, असं इंजमाम म्हणाला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाच्या युट्यूब चॅनलवर इंजमाम बोलत होता.


टीमचा कर्णधार आणि प्रशिक्षक हे एकाच विचाराचे असले पाहिजेत, तसंच त्यांनी खेळाडू अपयशी ठरत असेल, तरी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. जर खेळाडूला त्याचं टीममधलं स्थान धोक्यात आहे, असं वाटत असेल तर तो टीमसाठी न खेळता स्वत:साठी खेळतो. खराब फॉर्ममध्ये असतानाही इम्रान खानने मला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानने १९९२ सालचा वर्ल्ड कप जिंकला. सगळ्यात आधी टीम या भूमिकेचं याच्यापेक्षा चांगलं उदाहरण असू शकत नाही, असं इंजमाम म्हणाला.


इम्रान खान हा तंत्रशुद्ध कर्णधार नव्हता, पण खेळाडूंकडून नेमकं काय काढून घ्यायचं, हे इम्रानला बरोबर माहिती होतं. इम्रानने तरुण खेळाडूंवर आणि त्याच्या ज्याच्यावर विश्वास आहे, अशा खेळाडूंवर विश्वास दाखवला, यामुळेच तो सर्वोत्तम कर्णधार झाला, असं मत इंजमामने मांडलं.