मुंबई : इंडियन क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत असताना त्याचा फटका आता टीम इंडियालाही बसला आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या ऋषभ पंत इंग्लंडमध्ये त्याच्या नातेवाईकांकडे क्वारंटाईन झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअनआयने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती आहे. यापैकी एक खेळाडू ऋषभ पंत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ऋषभ पंत याला कोरोनाची लागण झाली असून तो सध्या इंग्लडंमध्ये क्वारंटाईन आहे.


दरम्यान काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत युरो कपची मॅच पाहण्यासाठी गेला होता. इंग्लंड विरूद्ध जर्मनीची मॅच पाहण्यासाठी पंत लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये गेला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते. विनामास्क फोटो काढल्यामुळे पंतला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. 


पंतची हीच चूक महागात पडली असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान पंतला आता 18 जुलैपर्यंत क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार आहे. यानंतर त्याची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केली जाईल. याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर तो डरहममधील प्रॅक्टिस सेशनला जाऊ शकणार आहे.


टीम इंडिया इंग्लंडविरोधात 5 मॅचेसची टेस्ट सिरीज खेळणार असून 4 ऑगस्टपासून याला सुरुवात होणार आहे.