मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला संघातील सलामीवीर पूनम राऊत चांगली कामगिरी करतेय. पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपमधील सामन्यात तिने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी क्रिकेटर पूनम राऊत हिला हे यश सहज मिळालेलं नाही. तिनं हे यश बिकट परिस्थितीवर मात करत मिळवलंय. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या संघर्षाचं आज चीज झालंय.


बोरीवलीतील मध्यमवर्गीय परिसरात सव्वा दोनशे स्क्वेअर फूटच्या घरात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पूनम राऊत लहानाची मोठी झाली.. पूनमचे वडील एका खासगी शाळेत ड्रायव्हरचं काम करतात. तर आई गृहिणी आहे....जेव्हा क्रिकेट खेळायला तिने सुरुवात केली तेव्हा क्रिकेटचं साहित्य विकत घेऊन देण्याचीही तिच्या वडिलांची परिस्थिती नव्हती. आणि याही परिस्थितीत पूनमने बॅट हातात धरली आणि तिच्या क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. 


पूनम सध्या भारतीय क्रिकेट टीमच्या सलामीची जबाबदारी सांभाळत असून सध्या लंडनमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये ती चमकदार कामगिरी करतेय. याखेरीज पूनमनं वर्ल्ड कपपूर्वी दीप्ती शर्मासह आयर्लंडविरुद्ध सलामीला 320 रन्सचा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. पूनमच्या नावे सध्या 47 वनडेत एक हजार 319 रन्स आहेत. पूनमकडून अनेकांनी प्रेरणा घेऊन क्रिकेटमध्ये करिअर करण्याची वाट धरली आहे...


पूनम एक उत्तम क्रिकेटर म्हणून आता सर्वांसमोर तर आलीच आहे...आणि आता राऊत कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे. तिच्या यशाचा आलेखं उत्तरोत्तर असाचं उंचावत राहावा, हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.