मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची पदक जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली. कांस्य पदकाच्या लढतीत इंग्लंडनं 4-3 नं भारतीय संघाचा पराभव केला. भारताला पदक जिंकता आलं नसलं तरी संपूर्ण देश महिला खेळाडूंच्या खेळ भावनेची आणि कामगिरीची प्रशंसा करत आहे. भारतीय महिला हॉकीच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वोच्च कामगिरी समजली जात आहे. भारतीय हॉकीच्या महिलांनी खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठून इतिहासात आपलं नाव कोरलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला हॉकी संघातील अनेक खेळाडूंनी मोठ्या कष्टातून आपली ओळख निर्माण केली आहे. बहुतांशजणी या मध्यमवर्गीय गटातल्या आहेत. काही जणी तर अशा आहेत, की ज्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अशातच एका महिला खेळाडूच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि क्रीडाप्रेमी भावूक झाले.


एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर काही फोटो शेअर केले, आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, हे फोटो झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील बडकी छापर गावातल्या हॉकीपटू सलीमा टेटे हिच्या घराचे आहेत. सलीमा भारतीय महिला हॉकी संघाचा भाग आहे, जीने संघाला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देण्यासाठी लढा दिला.



सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून देशातील क्रीडाप्रेमींनी भावूक झाले. एका युजरने पंतप्रधान मोदी यांना हे फोटो टॅग करत म्हटलं आहे, सर ऑलिम्पिकमध्ये देशाला अभिमान मिळवून देणाऱ्या मुलीचा राजवाडा बघा'. अनेकांनी सलीमाचं घर पाहिल्यानंतर खेळाडूंच्या दयनीय अवस्थेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.


सलीमाचे आई-वडिल आणि बहिणी घरी टिव्ही नसल्याने तिचा खेळही पाहू शकत नव्हते. सिमडेगा जिल्हा प्रशासनाने सलीमाच्या घरी एक स्मार्ट टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स बसवला, जेणेकरून कुटुंबातील सदस्य टोकियो ऑलिम्पिकमधील महिला हॉकी सामना पाहू शकतील.


सलीमाच्या घराची आणि गावाची स्थिती पाहून आपण कल्पना करू शकतो की तिला कोणत्या परिस्थिताला सामोरं जावं लागलं आणि तिने आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या बळावर कशी प्रगती केली. 


पण या सर्व समस्यांवर मात करत भारतीय महिला हॉकी संघाने केलेली कामगिरी खरच कौतुकास्पद आहे. म्हणूनच भारतीय महिला संघाने केलेल्या जिगरबार खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे.