ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टला गुरुवारी ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरु होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. पण आता त्याच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. पृथ्वी शॉला झालेली दुखापत बरी होत आहे आणि तो मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी फिट होण्याची शक्यता आहे, असं रवी शास्त्री म्हणाले. बॉक्सिंग डे टेस्ट या सीरिजची तिसरी मॅच आहे. ही टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्ध सराव सामना खेळताना मिडविकेट बाऊंड्रीवर कॅच पकडताना पृथ्वी शॉच्या पायाला दुखापत झाली. शॉच्या डाव्या पावलाला दुखापत झाल्यामुळे त्याला आधीच पहिल्या टेस्टमधून माघार घ्यावी लागली. दुसरी टेस्ट १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये होणार आहे. रवी शास्त्रींनी दिलेल्या संकेतानुसार शॉ दुसरी टेस्टही खेळू शकणार नाही.


पृथ्वी शॉच्या दुखापतग्रस्त होण्याचं नक्कीच वाईट वाटतंय. पण तो लवकरच फिट होईल. त्यानं चालायला सुरुवात केली आहे. पुढच्या आठवड्यात त्यानं पळायला सुरुवात केली तर ते चांगले संकेत असतील. पृथ्वी शॉ युवा खेळाडू आहे, त्यामुळे तो लवकर फिट होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी ऑस्ट्रेलियाचं रेडिओ चॅनल 'सेन वाटेले'ला दिली.


ऑस्ट्रेलियाचं कठीण आव्हान


''ऑस्ट्रेलियाची टीम आम्हाला कठीण आव्हान देईल. मायदेशात कोणतीही टीम कमजोर नसते. स्वदेशात सगळ्याच टीम मजबूत असतात. ऑस्ट्रेलिया कोणतीच कसर सोडणार नाही पण आमच्याकडेही प्रतिभावान खेळाडू आहेत आणि या खेळाडूंकडे अनुभवही आहे. आमच्याकडे कुशल बॉलर आहेत'', असं शास्त्री म्हणाले.


भारतीय टीमला काही सत्रांमध्ये नाही तर लागोपाठ चांगलं प्रदर्शन करावं लागेल. एक-दोन चांगल्या सत्रांमुळे तुम्ही जिंकू शकत नाही. संपूर्ण मॅचमध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमवर प्रभुत्व गाजवावं लागेल. एका तासामध्येही मॅचचा निकाल पलटू शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.