सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर आता भारताला वनडे सीरिज खेळायची आहे. शनिवार १२ जानेवारीपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. उपकर्णधार रोहित शर्मा आणि एमएस धोनी भारतीय टीममध्ये दाखल झाले आहेत. मुलगी झाल्यामुळे रोहित शर्मा तिसरी टेस्ट संपल्यानंतर भारतात परतला होता. आता पुन्हा तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. दुसऱ्या वनडेआधी रोहित शर्मानं पत्रकार परिषदेमध्ये धोनीची भारतीय टीममधली भूमिका सांगितली. धोनीच्या उपस्थितीमुळे टीममध्ये शांती आणि धैर्य येतं. तसंच कर्णधार विराट कोहलीलाही मदत होते, असं रोहित शर्मा म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या मैदानातल्या आणि ड्रेसिंग रूममधल्या उपस्थितीची कर्णधाराला मदत होते. तसंच तळाला बॅटिंगला येऊन तो भारतासाठी मॅचही संपवतो. त्यानं आत्तापर्यंत शेवटच्या क्षणाला अनेक मॅच जिंकवून दिल्या आहेत. धोनीची ही भूमिका आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया रोहितनं दिली. धोनीचा शांत स्वभाव आणि त्याच्या सल्ल्याचा भारतीय टीमला फायदा होत असल्याचं वक्तव्य रोहितनं केलं.


टीममध्ये आता बदल होणार नाही


वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून आता भारतीय टीममध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असं रोहित शर्मानं स्पष्ट केलं. फक्त फॉर्म आणि दुखापतीमुळेच एखाद दुसरे बदल होतील, असं रोहित म्हणाला.


रोहितची मराठीत प्रतिक्रिया


या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मानं मराठीमध्येही प्रतिक्रिया दिली. वर्ल्ड कपसाठीचा सराव म्हणून आम्ही उरलेल्या १३ वनडे मॅचकडे बघत नसल्याचं रोहित म्हणाला. या वनडे सीरिज आम्ही सीरिजच्याच हिशोबानं खेळत आहोत. पण या सीरिज खेळताना वर्ल्ड कपचा सराव होईल, असं वक्तव्य रोहितनं केलं. तसंच खेळाडूंच्या तंत्रामधल्या त्रुटींवरही रोहितनं भाष्य केलं. प्रत्येक टीममध्ये त्रुटी या असतातच, कोणतीही टीम परिपूर्ण नसेत, असं मत रोहितनं व्यक्त केलं.



भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १२ जानेवारीला सिडनीत पहिली वनडे, १५ जानेवारीला मंगळवारी ऍडलेडमध्ये दुसरी वनडे आणि शुक्रवारी १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये तिसरी वनडे खेळवली जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत १२८ वनडे झाल्या आहेत. यातल्या ७३ ऑस्ट्रेलियानं आणि ४५ भारतानं जिंकल्या आहेत, तर १० मॅचचा कोणताही निकाल लागलेला नाही. 


३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपआधी भारत १३ वनडे मॅच खेळणार आहे. यातल्या ३ वनडे ऑस्ट्रेलियात आणि ५ वनडे न्यूझीलंडविरुद्ध होतील. तर यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातही भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ वनडे खेळेल. या १३ वनडे शिवाय भारत न्यूझीलंड दौऱ्यात ३ टी-२० आणि ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात २ टी-२० खेळेल.