मोहाली : गेल्या काही मॅचपासून अयशस्वी ठरत असलेल्या शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये धमाकेदार १४३ रन केल्या. या खेळीत धवनने १८ फोर आणि ३ सिक्स लगावले. हे शतक धवनच्या वनडे कारकिर्दीतील १६ वे शतक ठरले. त्याने या शतकी खेळीसह काही रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धवनने गेल्या पाच मॅचमध्ये अनुक्रमे १३ ,६, ०, २१ आणि १ अशा खेळी केल्या होत्या. धवनकडून सातत्याने होणाऱ्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला टीम बाहेर ठेवा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात होती. पण धवनने शतकी खेळीने आपल्यावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युतर दिले. शतकी खेळीसोबत धवनने केवळ पुनरागमनच केले नाही तर काही विक्रम देखील केले आहेत. धवनचे आजचे शतक हे १६ वे शतक ठरले. त्याने या सोबतच शतकाच्या बाबतीत भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफला मागे टाकले आहे.


धवनने केलेल्या शतकी खेळीमुळे लिस्ट ए मधील १० हजार रनचा त्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. लिस्ट ए मध्ये आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक वनडे मॅचचा समावेश होतो. धवनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीत १२७ मॅचमध्ये ५३४३ रन केल्या आहेत. यात त्याने १६ शतकं आणि २७ अर्धशतकं लगावली आहेत. शिखर धवनने १४३ रनच्या खेळीसोबत स्वत:चा वनडेतील सर्वोच्च खेळीचा विक्रम मोडीत काढला आहे. धवनने २०१५ साली श्रीलंकेसोबत झालेल्या मॅचमध्ये १३७ रन्सची खेळी केली होती. ती धवनची आतापर्यंतची सर्वोच्च खेळी होती.


धवनचे आजचे शतक हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तिसरे शतक ठरले. धवनने याआधी २०१५ ला १०० तर २०१६ साली १२६ रनची शतकी खेळी केली होती. भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही मॅचपासून रोहित-धवन या जोडीला भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यास सातत्याने अपयश येत होते. पण या जोडीने ही उणीव देखील भरुन काढली. या दोघांनी भारताला पहिल्या विकेटसाठी १९३ रनची पार्टनरशीप मिळवून दिली. यामुळे ही पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशीप आतापर्यंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धची विक्रमी पार्टनरशीप ठरली आहे.


याआधी देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी विक्रमी पार्टनरशीपचा रेकॉर्ड धवन-रोहित या जोडीच्या नावे होता. या जोडीने २०१३ ला नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये १७८ रनची पार्टनरशीप केली होती. रोहित-धवन या जोडीने आतापर्यंत एकत्र खेळताना एकूण ४,५७१ रनची पार्टनरशीप केली आहे. अशी कामगिरी करणारी ही दुसरीच जोडी ठरली आहे. आजच्या पार्टनरशीपमुळे रोहित-धवनने सचिन-सेहवाग या जोडीला मागे टाकले आहे. सचिन-सेहवाग या जोडीने आपल्या कारकिर्दीत एकत्र खेळताना एकूण ४३८७ रनची पार्टनरशीप केली होती. पार्टनरशीरपच्या बाबतीत भारताकडून सर्वाधिक रनचा विक्रम हा गांगुली-सचिन या जोडीच्या नावे आहे. या जोडीने पार्टनरशीप करताना एकूण ८२२७ रन केल्या होत्या.