नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या वनडे सीरिजदरम्यान सर्वाधिक लक्ष विजय शंकरच्या कामगिरीवर आहे. तामीळनाडूचा हा ऑलराऊंडर न्यूझीलंड दौऱ्यापासून भारतीय टीममध्ये आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याला जास्त प्राथमिकता देण्यात येत आहे. यामुळे विजय शंकरचा वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमसाठी विचार होत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे विजय शंकरच्या कामगिरीतही अचानक सुधारणा पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ वर्षांच्या विजय शंकरनं नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडेत विजय शंकर पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. या मॅचमध्ये विजय शंकरनं ४१ बॉलमध्ये ४६ रनची खेळी केली. कोहली वगळता भारताचे इतर बॅट्समन या खेळपट्टीवर लोटांगण घालत होते तिकडे विजय शंकर १०० पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटनं खेळत होता. विजय शंकर बॅटिंगला आला तेव्हा भारताचा स्कोअर १७ ओव्हरमध्ये ७५ रनवर ३ विकेट असा होता.


बहुतेकवेळा भारतीय टीम पाचव्या क्रमांकावर धोनीला बॅटिंगला पाठवते, पण रायुडूची विकेट गेल्यानंतर अचानक विजय शंकरला पाठवण्यात आलं. वर्ल्ड कपसाठी विजय शंकर भारतीय टीममध्ये फिट आहे का नाही याची परीक्षा पाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. विजय शंकरनेही या संधीचं सोनं केलं. विजय शंकरच्या ४१ बॉलमध्ये ४६ रनच्या खेळीमध्ये ५ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता.


विजय शंकर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या अर्धशतकाच्या जवळ होता. पण कर्णधार विराट कोहलीच्या एका शॉटनं विजय शंकरचं पहिलं अर्धशतक करण्याचं स्वप्न भंगलं. विराट कोहलीनं मारलेला एक स्ट्रेट ड्राईव्ह ऑस्ट्रेलियाचा स्पिनर एडम झम्पाच्या हाताला लागला आणि बॉल स्टम्पला जाऊन आदळला. यावेळी विजय शंकर नॉन स्ट्रायकर एण्डच्या बाहेर आला होता. त्यामुळे विजय शंकरला रन आऊट होऊन माघारी परतावं लागलं. विजय शंकरचा हा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी ४५ रन हा विजय शंकरचा सर्वाधिक स्कोअर होता.