INDvsNZ: आणि रोहितच्या रेकॉर्डला ब्रेक लागला
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला आहे.
वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला आहे. वेलिंग्टनमध्ये झालेल्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा ३५ रननी विजय झाला. न्यूझीलंडमध्ये एका वनडे सीरिजमध्ये ४ मॅच जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. या सीरिजच्या पहिल्या तिन्ही मॅचमध्ये विराट कोहली भारताचा कर्णधार होता. या तिन्ही मॅच जिंकत भारतानं सीरिज तेव्हाच खिशात टाकली होती. यानंतर शेवटच्या २ मॅच आणि टी-२० सीरिजसाठी विराटला विश्रांती देण्यात आली. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं. यानंतर चौथ्या मॅचमध्ये भारताचा पराभव आणि पाचव्या मॅचमध्ये विजय झाला.
कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी चांगली झाली असली तरी त्याच्या विश्वविक्रमी कामगिरीला मात्र ब्रेक लागला आहे. या सीरिजमध्ये रोहित शर्माला एकही शतक करता आलं नाही. रोहितनं २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लागोपाठ १० सीरिजमध्ये शतक झळकावलं होतं. यावेळी मात्र रोहितला शतक करता आलं नाही. या सीरिजमध्ये रोहितनं ११, ६२, ८७, ७ आणि २ एवढ्या रन केल्या.
सलग सीरिजमध्ये शतक करण्याचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. या यादीत विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा हशीम आमला दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी सलग ६ सीरिजमध्ये शतक झळकावलं होतं. सचिन तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये लागोपाठ ५ सीरिजमध्ये शतक केलं होतं.