INDvsNZ: हॅमिल्टनमध्ये रोहित खेळणार २००वी वनडे, या रेकॉर्डवर नजर
भारत आणि न्यूझीलंडमधली चौथी वनडे गुरुवारी सेडन पार्क मैदानात खेळवण्यात येणार आहे.
हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंडमधली चौथी वनडे गुरुवारी सेडन पार्क मैदानात खेळवण्यात येणार आहे. ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं आधीच ३-०ची विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या वनडेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आता उरलेल्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व असेल. रोहित शर्माकडे या मॅचमध्ये त्याचं बॅटिंग आणि कर्णधारपदाचं रेकॉर्ड सुधारण्याची संधी आहे. हॅमिल्टनमध्ये होणारी रोहित शर्माची २००वी वनडे मॅच असेल. त्यामुळे रोहित शर्मा त्याचं आंतरराष्ट्रीय वनडे मॅचचं हे 'द्विशतक' आठवणीतलं बनवण्यासाठी मैदानात उतरेल.
रोहितचं कर्णधार म्हणून रेकॉर्ड
रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमध्ये कमी मॅचमध्येच भारताचं कर्णधारपद भूषवलं आहे. पण या मॅचमध्ये भारतानं शानदार कामगिरी केली आहे. रोहितनं आत्तापर्यंत ८ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं. यातली पहिली वनडे गमावल्यानंतर पुढच्या लागोपाठ ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. रोहितनं आशिया कपमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं, तेव्हा भारतानं एकही सामना गमावला नव्हता.
रोहितचं वनडे रेकॉर्ड
रोहित शर्मानं आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं केली आहेत. चौथ्या वनडेमध्ये रोहितला आणखी एक द्विशतक करण्याची संधी आहे. रोहितनं १९९ वनडेच्या १९३ इनिंगमध्ये ८८.६१ च्या स्ट्राईक रेटनं आणि ४८.१४ च्या सरासरीनं ७,७९९ रन केल्या आहेत. चौथ्या वनडेमध्ये रोहितनं द्विशतक केलं, तर त्याच्या वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रन पूर्ण होतील.
भारतीय टीमची रेकॉर्डवर नजर
जर भारतानं चौथी मॅच जिंकून ४-०नं आघाडी घेतली, तर ५२ वर्षातला भारताचा न्यूझीलंडमधला सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधला सर्वात मोठा विजय असेल. भारतानं १९६७ साली पहिल्यांदा न्यूझीलंडचा दौरा केला होता. याआधी भारताला फक्त २००८-०९ मध्ये न्यूझीलंडमध्ये वनडे सीरिज जिंकता आली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वात भारताचा ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ३-१नं विजय झाला होता. त्या सीरिजमधली पहिली, तिसरी आणि चौथी मॅच भारतानं जिंकली होती, तर पाचव्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला होता. सीरिजची दुसरी मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
विराट कोहली सुट्टीवर, चौथ्या वनडेत रोहित या खेळाडूंना संधी देणार?