हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला. याचबरोबर भारतानं ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये ३-०ची विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या मॅचनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये विराट कोहली खेळणार नाही. लागोपाठ क्रिकेट खेळत असल्यामुळे विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विराटच्याऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
भारत आणि न्यूझीलंडविरुद्धची चौथी वनडे गुरुवारी ३१ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये विराटऐवजी कोणत्या खेळाडूला खेळवायचं याचा निर्णय रोहित शर्माला घ्यावा लागणार आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये धोनीच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती, त्यामुळे तो या मॅचला मुकला होता. आता धोनीची दुखापत बरी झाली असेल तर तो टीममध्ये पुनरागमन करेल.
धोनीचं पुनरागमन झालं तर तिसऱ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करेल, याचं उत्तरही रोहितला शोधावं लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी भारताकडे शुभमन गिल आणि अंबाती रायुडू यांचा पर्याय उपलब्ध आहे. तिसऱ्या वनडेनंतर कोहलीनं शुभमन गिलचं कौतुक केलं होतं. १९ वर्षांचा असताना मी शुभमनच्या १० टक्केही नव्हतो, असं विराट म्हणाला होता. तसंच विराटनं शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, असे संकेत दिले होते.
चौथ्या वनडेमध्येही धोनी फिट झाला नाही, तर शुभमन गिलला टीममध्ये सरळ संधी मिळू शकते. पण धोनी फिट झाला तर मात्र रोहितची डोकेदुखी वाढेल. कारण शुभमन गिलला संधी द्यायची असेल तर एका खेळाडूला टीमबाहेर बसवावं लागेल. तिसऱ्या वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणारा अंबाती रायुडूनं नाबाद ४० रनची खेळी केली.
चौथ्या वनडेमध्ये धोनीला दुखापत झाल्यामुळे दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती. या संधीचा कार्तिकनं फायदा उठवला. कार्तिकनं विकेट कीपिंग करताना ४ कॅच पकडले आणि नाबाद ३८ रन केल्या. त्यामुळे रायुडू आणि कार्तिकनं त्यांचं टीममधलं स्थान पक्क केलं आहे.
तर दुसरीकडे सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणारा केदार जाधवही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एवढच नाही तर केदार जाधव त्याच्या फिरकी बॉलिंगमुळे कर्णधाराला पर्यायही देतो. अशात केदार जाधवला टीमबाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिक पांड्याचं मागच्याच मॅचमध्ये पुनरागमन झालं आहे. त्यामुळे त्यालाही टीमबाहेर ठेवता येणार नाही.
भारतीय टीमचा सध्याचा बॅटिंग फॉर्म बघता रोहितला जर शुभमन गिलला संधी द्यायची असेल, तर धोनीला आणखी एक मॅच विश्रांती द्यावी लागेल किंवा एका बॅट्समनला टीमबाहेर बसवावं लागेल. सगळे खेळाडू फॉर्ममध्ये असल्यामुळे रोहित शर्मासाठी मात्र ही निवड डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्चित आहे.
दुसरीकडे भारताची बॉलिंग बघितली तर खलील अहमद किंवा मोहम्मद सीरिज यांच्यापैकी एकाला पुढच्या मॅचमध्ये संधी दिली जाऊ शकते. मोहम्मद शमीच्या जागी या दोघांपैकी एका फास्ट बॉलरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ३ मॅचपैकी २ मॅचमध्ये शमी मॅन ऑफ द मॅच होता. पण मोहम्मद शमी वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा आणि आता न्यूझीलंडविरुद्धच्या मॅच असं लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे शमीला विश्रांती द्यायचा विचार होऊ शकतो.
रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, शुभमन गिल, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, विजय शंकर