पोर्ट ऑफ स्पेन: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे जावेद मियाँदाद यांचा २६ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे. भारतीय संघ रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडिजच्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांच्या नावावर आहे. त्यांनी विंडिजविरुद्धच्या ६४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९३० धावा केल्या होत्या. विराट कोहली या विक्रमापासून अवघ्या १९ धावा दूर आहे. त्यामुळे विराट आज या विक्रमाला गवसणी घालणार का, याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागलेले आहे. 


जावेद मियाँदाद १९९३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा सामना खेळले होते. त्यांनी विंडिजच्या संघाविरुद्ध ६४ एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम रचला होता. मात्र, विराट अवघे ३४ सामने खेळून या विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 


दरम्यान, विंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटला फलंदाजीची संधीही मिळाली नव्हती. कारण हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. 


तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्याने भारतीय संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आतूर आहे. जेणेकरून तिसऱ्या सामन्यात यजमानांवर दबाब राखता येईल. 


शिखर धवनचे संघात पुनरागमन झाल्यामुळे विराटला त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरता येईल. त्यामुळे चाहत्यांना विराटकडून आजच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.