IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच हाय व्होलटेज सामना, मुंबई `या` टीमसह भिडणार
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दुबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने (bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या दुसऱ्या टप्प्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या टप्प्याची धमाकेदार सुरुवात होणार आहे. आयपीएल इतिहासातील दोन यशस्वी संघ आमनेसामने भिडणार आहेत. या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात सर्वाधिकआयपीएल विजेतेपद जिंकणारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. मुंबईने 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात रंगतदार झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. (IPL 14th season in second phase 1st match of will be played between Mumbai Indians and Chennai Super Kings)
या सामन्यात चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने निर्णायक क्षणी जोरदार फटकेबाजी केली. पोलार्डने 34 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी केली होती.
27 दिवसात 31 सामने
बीसीसीआयने यूएईत एकूण 27 दिवसांमध्ये 31 सामन्यांचं आयोजन केलंय. यामध्ये 7 डबल हेडर सामन्यांचा समावेश आहे. डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने. दिवसातील पहिल्या मॅचला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर संध्याकाळचा सामना नेहमीप्रमाणे 7.30 वाजता सुरु होईल.
25 सप्टेंबरपासून डबल हेडर
14 व्या मोसमातील पहिली डबल हेडर मॅच 25 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. यामधील पहिली मॅच ही दिल्ली विरुद्ध राजस्थान यांच्यात पार पडेल. तर दुसरी मॅचमध्ये हैदराबाद आणि पंजाब किंग्स आमनेसामने असतील.
दुसऱ्या टप्प्यातही एकूण 3 स्टेडियममध्येच हे सामने खेळवले जातील. त्यापैकी दुबईमध्ये 13, शारजाहमध्ये 10 तर अबूधाबीत 8 सामने खेळवण्यात येणार आहे. तर फायनल मॅचचे (IPL 2021 Final) आयोजनही दुबईत करण्यात आलंय.