मुंबईचं टेन्शन वाढलं! कोलकात्यानं पंजाबला हरवलं
कोलकात्यानं पंजाबचा ३१ रननी पराभव केला आहे.
इंदूर : कोलकात्यानं पंजाबचा ३१ रननी पराभव केला आहे. कोलकात्याच्या या विजयामुळे मुंबईचं टेन्शन मात्र वाढलं आहे. पंजाबविरुद्धच्या विजयामुळे कोलकाता चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे. कोलकात्यानं १२ पैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांच्याकडे १२ पॉईंट्स आहेत. तर पंजाबनं ११ मॅचपैकी ६ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्याकडेही १२ पॉईंट्सच आहेत. नेट रनरेटमुळे पंजाबची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं ११ मॅचपैकी ५ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १० पॉईंट्स आहेत. राजस्थानची अवस्थाही मुंबईसारखीच आहे. राजस्थाननंही ११पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. राजस्थानचा नेट रनरेट मुंबईपेक्षा कमी असल्यामुळे ते सहाव्या क्रमांकावर आहेत. पॉईंट्स टेबलमधल्या पहिल्या ४ टीम प्ले ऑफसाठी क्वालिफाय होणार आहेत.
कोलकात्याचा रनचा डोंगर
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं रनचा डोंगर उभारला आहे. या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला पण ही खेळी पंजाबच्या चांगलीच अंगाशी आली आहे. कोलकात्यानं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २४५ रन केल्या आहेत. ओपनिंगला आलेल्या सुनिल नारायणनं ३६ बॉलमध्ये ७५ रनची वादळी खेळी केली. नारायणच्या इनिंगमध्ये ९ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. तर कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकनं २३ बॉलमध्ये ५० रन केले. दिनेश कार्तिकनं ५ फोर आणि ३ सिक्स लगावले. पंजाबकडून अॅण्ड्रयू टायनं ४ ओव्हरमध्ये ४१ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर बरिंदर श्रन आणि मोहित शर्माला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
राहुलचं पुन्हा अर्धशतक
कोलकात्यानं ठेवलेल्या २४६ रनचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली, राहुल आणि गेलनं पंजाबला ५ ओव्हरमध्येच ५० रनपर्यंत पोहोचवलं. पण गेलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का लागला. आयपीएलच्या या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलनं आणखी एक अर्धशतक केलं. राहुलनं २९ बॉलमध्ये ६६ रनची खेळी केली. यामध्ये २ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. राहुलच्या विकेटनंतर मात्र पंजाबच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णाला २ आणि सुनिल नारायण, जेव्होन सिरलेस, कुलदीप यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.