मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये काही खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला, तर काही खेळाडूंना कोणत्याच टीमनी विकत घेतलं नाही. विकत न घेतलेल्या खेळाडूंमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. तर अनेक युवा क्रिकेटपटू आयपीएलच्या लिलावामुळे करोडपती झाले आहेत. या लिलावात १६ वर्षांचा प्रयास रे बर्मन हा करोडपती होणारा सगळ्यात लहान क्रिकेटपटू आहे. बंगळुरूच्या टीमनं प्रयासला १.५ कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएलच्या या मोसमात बोली लागणारा तो सगळ्यात लहान क्रिकेटपटूही ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालचा असलेला प्रयास आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार असलेल्या बंगळुरूकडून खेळेल. लिलावाच्या दिवशी प्रयास रेचं वय १६ वर्ष आणि ५४ दिवस होतं. प्रयास रे बर्मननं आत्तापर्यंत ९ लिस्ट ए मॅचमध्ये ११ विकेट घेतल्या आहेत.


सगळ्यात लहान वयात आयपीएलची मॅच खेळण्याचं रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानच्या नावावर आहे. २०१८ साली मुजीब पंजाबकडून आयपीएलची पहिली मॅच खेळला. यावेळी त्याचं वय १७ वर्ष आणि ११ दिवस होतं. भारताच्या सरफराज खान २०१५ साली आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळला. तेव्हा सरफराजचं वय १७ वर्ष आणि १७७ दिवस होतं. यावर्षी बंगळुरूनं प्रयासला खेळण्याची संधी दिली, तर तो आयपीएल खेळणारा सगळ्यात लहान खेळाडू ठरेल.


प्रभू सिमरन सिंगवर ४.८० कोटीची बोली


प्रयास रे बर्मनप्रमाणेच प्रभू सिमरन सिंगवरही मोठी बोली लागली. पंजाबनं १८ वर्षांच्या प्रभू सिमरन सिंगला ४.८० कोटी रुपये देऊन विकत घेतलं. आयपीएलच्या या मोसमात वरुण चक्रवर्ती या कमी जणांना माहिती असलेल्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली. २० लाखांची बेस प्राईज असलेल्या वरुणला पंजाबनं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. १.५० कोटीची बेस प्राईज असलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थाननं ८.४० कोटी रुपयेच दिले.


हिमाचल प्रदेशचा क्रिकेटपटू पंकज जयस्वालला मुंबईनं टीममध्ये घेतलं. रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार शतक केल्यामुळे मुंबईनं पंकजवर बोली लावली. २३ वर्षांचा बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या पंकजला मुंबईनं त्याची बेस प्राईज २० लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. हिमाचल प्रदेशच्या पंकज जयस्वालनं मागच्या रणजी ट्रॉफीच्या एका मॅचमध्ये गोव्याविरुद्ध १६ बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातली हे दुसरं सगळ्यात जलद अर्धशतक होतं.