हैदराबाद : मुंबईने शनिवारी यजमान हैदराबादचा ४० रनने पराभव केला. या पराभवासोबतच मुंबईने हैदराबादच्या विजयी घोडदौडीला लगाम लावला. मुंबईच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे अल्झारी जोसेफ. अल्झारी जोसेफची आयपीएल मधील ही पहिलीच मॅच होती. मलिंगा मायदेशी परतल्याने त्याला टीममध्ये संधी मिळाली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


जोसेफने ३.४ ओव्हरमध्ये फक्त १२ रन देत ६ विकेट घेतल्या. यात त्याने १ ओव्हर मेडन टाकली. जोसेफने वॉर्नर, विजय शंकर, हु़डा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्दार्थ कौल यांना माघारी पाठवले.


 



 


पदार्पणात जोसेफने आपल्या बॉलिंगने केवळ टीमला विजयच मिळवून दिला नाही तर, एका डावात सर्वाधिक विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड देखील केला आहे. याआधी एका डावात ६ विकेट घेण्याची कामगिरी पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने केली होती. सोहेल तन्वीर २००८ साली राजस्थानकडून खेळत होता. तनवीरने २००८ साली चेन्नई विरुद्ध १४ रन देत ६ विकेट घेतल्या होत्या. परंतू तन्वीरच्या तुलनेत जोसेफने २ रन कमी देत आणि १ मेडेन ओव्हर टाकत ६ विकेट घेतले आहेत.


जोसेफचे क्रिकेटप्रेम


जोसेफने याआधी फेब्रुवारी महिन्यात क्रिकेटबद्दल त्याची निष्ठा दाखवून दिली होती. आपली आई गेल्याचे वृत्त समजले असताना देखील तो शोक न करता वेस्ट इंडिजसाठी खेळत होता. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात एटींग्वा येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी, अल्झारी जोसेफला आपल्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समजले. अशा दु:खद प्रसंगी देखील, त्याने आपल्या घराकडे धाव न घेता, तो संघासाठी मैदानात उतरला. यावेळी स्टेडिअम मध्ये उपस्थित क्रिकेट प्रेक्षकांनी अल्झारी जोसेफच्या या खिलाडू वृत्तीला उभे राहून सलाम केला. 



 


आपल्या खेळाडूच्या दु:खात वेस्ट इंडिजचा संघ देखील सहभागी झाला. वेस्ट इंडिजच्या संघाने काळी फित बांधून अल्झारी जोसेफच्या सोबत असल्याची जाणीव करुन दिली. ही दु:खद घटना समजल्यावर वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी अल्झारी जोसेफ सोबत संवाद साधून त्याचे सांत्वन केले.