जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये मुंबईच्या टीमनं युवराज सिंग आणि लसिथ मलिंगाला विकत घेतलं. मुंबईनं युवराजला १ कोटी आणि मलिंगाला २ कोटी रुपये देऊन टीममध्ये सहभागी केलं. लिलावाच्या पहिल्या सत्रामध्ये या दोन्ही खेळाडूंवर बोली न लागल्यामुळे ते विकले गेले नाहीत. पण दुसऱ्या सत्रामध्ये या दोघांचं नाव पुन्हा एकदा आल्यामुळे मुंबईनं दोघांवर बोली लावली, आणि दोघांना त्यांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. ३७ वर्षांचा युवराज आणि ३५ वर्षांचा मलिंगा हे दोघं त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आहेत. त्यामुळे मुंबईनं या दोघांना टीममध्ये घेऊन मोठा जुगार खेळल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई टीमचा मालक आकाश अंबानीनं या दोन खेळाडूंना टीममध्ये का घेतलं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या टीममध्ये बरचे युवा खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला अनुभवी खेळाडूंची गरज होती, म्हणून आम्ही युवराज आणि मलिंगाला टीममध्ये घेतल्याचं आकाश अंबानी म्हणाला. युवराज आणि मलिंगा टीममध्ये आल्यामुळे आम्ही लकी आहोत, अशी प्रतिक्रिया आकाश अंबानीनं स्टार स्पोर्ट्सची बोलताना दिली. या दोन्ही खेळाडूंसाठी आमच्याकडे रणनिती आहे, असं वक्तव्य आकाश अंबानीनी केलं. तसंच हे दोन्ही खेळाडू त्यांच्या बेस प्राईजवर विकले जातील, असं आम्हालाही वाटलं नव्हतं, अशी कबुली आकाश अंबानीनी दिली.


पहिल्या सत्रामध्ये युवराजला विकत का घेतलं नाही? हे विचारलं असता आम्हाला उशीरा अक्कल आल्याची प्रतिक्रिया मुंबईच्या टीमकडून देण्यात आली. युवराज सिंगच्या नावावर मोठी विरासत आहे. त्याचा अनुभव तो युवा खेळाडूंसोबत शेअर करू शकतो. २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये युवराज मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. तसंच २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप जिंकवण्यातही युवराजनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं मुंबईच्या टीमनं सांगितलं.


युवराज सिंग हा आयपीएलचा प्रत्येक मोसम खेळला आहे. तर लसिथ मलिंगा आयपीएल इतिहासातला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट मलिंगाच्या नावावर आहे. मागच्या मोसमात मलिंगा मुंबईच्या टीमचा प्रशिक्षक होता. या मोसमात त्यानं पुन्हा एकदा खेळाडू म्हणून पुनरागमन केलं आहे.


युवराजची प्रतिक्रिया


मुंबईच्या टीममध्ये निवड झाल्यानंतर युवराजनं ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या कुटुंबात जोडला गेल्याचा मला अभिमान वाटत असल्याचं युवराज म्हणाला.


युवराजला सगळ्यात कमी किंमत


३७ वर्षांच्या युवराजला यावर्षी लिलावात मागच्या लिलावांपेक्षा सगळ्यात कमी किंमत मिळाली. २०१५ साली युवराज १६ कोटी रुपये आणि २०१४ साली १४ कोटी रुपयांना विकला गेला होता. यावेळी मात्र त्याला फक्त १ कोटी रुपयांवर समाधान मानावं लागलं. मागच्या वर्षी पंजाबनं युवराजला २ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.