जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवारी १८ डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. आयपीएलच्या या लिलावासाठी १००३ खेळाडूंनी अर्ज केले होते. पण यातल्या फक्त ३४६ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या सगळ्या ८ टीमनी मिळून या ३४६ खेळाडूंची निवड केली. आयपीएलच्या टीमनी निवडलेले हे ३४६ खेळाडू आयपीएल कार्यकारी परिषदेला पाठवण्यात आले. या खेळाडूंमध्ये युवराज सिंग, जयदेव उनाडकट, अक्सर पटेल, मोहम्मद शमी या दिग्गज भारतीयांचा लिलाव होणार आहे. तर लसिथ मलिंगा, डेल स्टेन, ब्रॅण्डन मॅक्कलम, क्रिस वोक्स, सॅम कुरन, शॉन मार्श, कॉलीन इंग्राम, कोरे अंडरसन, एंजलो मॅथ्यूज यांच्यासारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर बोली लागेल.


८ टीमपुढची आव्हानं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी होणारी आयपीएल २९ मार्चला सुरु होणार असून १९ मेरोजी आयपीएलची फायनल होणार आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होणार असल्यामुळे २०१९ सालची आयपीएल लवकर होणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएल मधून लवकर माघार घेणार आहेत. त्यामुळे आयपीएल टीमना वेगळी रणनिती आखावी लागणार आहे. लिलावामध्ये या टीमना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंचे बदली खेळाडू विकत घ्यावे लागतील. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू मात्र आयपीएलसाठी पूर्ण वेळ असणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आयपीएल टीम जास्त पसंती देतील.


ज्या खेळाडूंची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार नाही, त्या खेळाडूंवरच आयपीएलच्या टीम बोली लावतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू १० मेपर्यंत आयपीएलसाठी उपलब्ध असतील, असं बोललं जातंय.


२०१९ साली भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी २००९ आणि २०१४ सालच्या निवडणुकांवेळी सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली. २००९ सालची संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली. तर २०१४ सालची अर्धी आयपीएल युएईमध्ये झाली, तर आयपीएलचे उरलेले सामने भारतात झाले. यावर्षीही आयपीएलचा काही भाग किंवा संपूर्ण आयपीएल भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिलावामध्ये खेळाडू निवडताना सगळ्या टीमचा कस लागणार आहे. आयपीएल भारताबाहेर होणार असेल तर तिथल्या खेळपट्ट्यांनुसार लिलावात खेळाडूंना विकत घ्यावं लागणार आहे.


राजस्थानची अडचण


२०१९ च्या आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त अडचण राजस्थानच्या टीमची होणार आहे. बेन स्टोक्स, जॉस बटलर आणि जोफ्रा आर्चर या तिघांची इंग्लंडच्या वर्ल्ड कप टीममध्ये आणि स्टिव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड टीममध्ये होणारी निवड जवळपास निश्चित आहे. हे सगळे खेळाडू राजस्थानचे महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्याबदली नवे खेळाडू घेण्याचं आव्हान राजस्थानसमोर असणार आहे.