चेन्नई : आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नईची टीम शानदार कामगिरी करत आहे. चेन्नईने ६ पैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यामुळे १० पॉईंट्ससह चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईने मंगळवारी घरच्या मैदानात कोलकात्याचा ७ विकेटने पराभव केला. आता धोनीची पुढची मॅच गुरुवारी राजस्थानविरुद्ध जयपूरमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यस्त वेळापत्रकामुळे चेन्नईला कोलकात्याची मॅच संपल्यानंतर लगेच जयपूरला रवाना व्हावं लागलं. बुधवारी चेन्नई एअरपोर्टवर विमानाची वाट बघत असताना धोनी आणि त्याची पत्नी साक्षी चक्क जमिनीवरच झोपले. धोनीने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'आयपीएलच्या वेळापत्रकामुळे सकाळचं विमान असेल, तर अशीच अवस्था होते,' असं कॅप्शन धोनीने हा फोटोला दिलं आहे.



कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये १०९ रनचा पाठलाग करताना चेन्नईचीही दमछाक झाली. कोलकात्याच्या माफक आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १७.२ ओव्हरमध्ये केला. चेन्नईचा ओपनर फॅप डुप्लेसिस ४३ रनवर आणि केदार जाधव ८ रनवर नाबाद राहिला. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर १८ रन असताना शेन वॉटसन १७ रन करून आऊट झाला. सुरेश रैना १४ रनवर आणि अंबाती रायुडू २१ रनवर आऊट झाला. कोलकात्याकडून सुनील नारायणने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर पियुष चावलाला एक विकेट मिळाली.


या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकून कोलकात्याला पहिले बॅटिंगला बोलावलं. चेन्नईने सुरुवातीपासूनच कोलकात्याला धक्के दिले. कोलकात्याची अवस्था एकवेळ ४७/६ अशी झाली होती. पण आंद्रे रसेलने पुन्हा एकदा कोलकात्याला सावरलं. रसेलने ४४ बॉलमध्ये ५० रन केले. कोलकात्याचे ४ खेळाडू शून्य रनवर आऊट झाले. कोलकात्याला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १०८ रनपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.