IPL 2019: प्लेऑफमध्ये जायचा `या` दोन टीमचा मार्ग सोपा
आयपीएलचा १२वा मोसम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे.
मुंबई : आयपीएलचा १२वा मोसम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. चेन्नई आणि दिल्लीने प्ले-ऑफमध्ये आधीच प्रवेश केला आहे. तर बंगळुरू वगळता उरलेल्या ५ टीम अजूनही प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहेत. मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या ५ टीमपैकी फक्त २ टीमच प्ले-ऑफमध्ये पोहोचतील. आकडेवारीवर नजर टाकली तर सध्या तरी मुंबई आणि हैदराबादच्या टीम प्ले-ऑफमध्ये जातील, अशी शक्यता जास्त आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये सध्या मुंबईची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या १२ मॅचपैकी ७ मॅचमध्ये मुंबईचा विजय आणि ५ मॅचमध्ये पराभव झाला. यामुळे मुंबईच्या खात्यात १४ पॉईंट्स आहेत. उरलेल्या २ मॅचपैकी एका मॅचमध्ये जरी मुंबईचा विजय झाला, तर ते थेट प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. तसंच या २ मॅचमध्ये मुंबईचा कमी फरकाने पराभव झाला तरी त्यांना प्ले ऑफमध्ये जाणं फारसं कठीण होणार नाही. कारण नेट रनरेटच्या बाबतीत मुंबईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या मुंबईचा नेट रनरेट +०.३४७ एवढा आहे. मुंबईच्या उरलेल्या दोन्ही मॅच या प्ले-ऑफच्या स्पर्धेत असलेल्या हैदराबाद आणि कोलकात्याशी होणार आहेत.
प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या टीमपैकी हैदराबादचा नेट रनरेट हा सगळ्यात चांगला आहे. हैदराबादचा सध्याचा नेट रनरेट +०.७०९ एवढा आहे. हैदराबादचा आत्तापर्यंत खेळलेल्या १२ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय आणि ६ मॅचमध्ये पराभव झाला आहे. यामुळे त्यांच्या खात्यात १२ पॉईंट्स आहेत. उरलेल्या दोनपैकी दोन्ही मॅचमध्ये हैदराबादचा विजय झाला तर ते थेट प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवतील. तर दोनपैकी एका सामन्यात पराभव आणि एका सामन्यात विजय झाला तरी चांगल्या नेट रनरेटमुळे हैदराबादची टीम प्लेऑफमध्ये सहज पोहोचू शकते.
प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या कोलकाता, पंजाब आणि राजस्थान यांचा मार्ग मात्र मुंबई आणि हैदराबादपेक्षा जास्त खडतर आहे. पंजाब आणि राजस्थानचा नेट रनरेट हा वजा आहे. तर कोलकात्याचा नेट रन रेट हा हैदराबाद आणि मुंबईपेक्षा कमी आहे. त्यामुळे या तिन्ही टीमना उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
कोलकात्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १२ मॅचपैकी ५ मॅच जिंकल्या आहेत, तर ७ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. १० पॉईंट्ससह कोलकात्याची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याचा नेट रनरेट हा +०.१०० आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी कोलकात्याला उरलेल्या दोन्ही मॅच या फक्त जिंकाव्याच नाही तर मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार आहेत. या मॅच मोठ्या फरकाने जिंकल्या तर त्यांचा नेट रनरेट चांगला होईल. पण नेट रनरेट चांगला झाला तरी इतर मॅचच्या निकालावर कोलकात्याचं भवितव्य अवलंबून राहिल.
पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबने १२ पैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला, तर ७ मॅचमध्ये त्यांच्या पदरी निराशा आली. पंजाबच्या खात्यात सध्या १० पॉईंट्स आहेत. पण त्यांचा नेट रनरेट हा -०.२९६ एवढा आहे. उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये पंजाबला मोठ्या फरकाने विजय मिळवाला लागेल. तसंच इतर मॅचच्या निकालांवरही पंजाबचं भवितव्य अवलंबून आहे. पण वजा नेट रनरेट असल्यामुळे त्यांचं प्ले ऑफमध्ये जाणं सध्या तरी अशक्य वाटत आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर असली तरी राजस्थानची टीमही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. राजस्थानने खेळलेल्या १२ मॅचपैकी ५ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर ७ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. राजस्थानचा नेट रनरेट -०.३२१ इतका आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबप्रमाणेच राजस्थानलाही उरलेल्या दोन्ही मॅच मोठ्या फरकाने जिंकाव्या लागतील. या दोन्ही मॅच मोठ्या फरकाने जिंकल्या तरी इतर निकालांवर राजस्थानचं भवितव्य ठरेल. त्यामुळे राजस्थानच्या टीमचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार असंच दिसत आहे.