हैदराबाद : २०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला. अत्यंत रोमहर्षक अशा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर १ रनने पराभव केला. आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसनने ८० रनची खेळी करून चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं, पण मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मुंबईला चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचदरम्यान वाईडवरून काही वाद पाहायला मिळाले. मुंबईची बॅटिंग सुरु असताना ब्राव्होने टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये पोलार्ड अंपायरवर भडकला. ब्राव्होने टाकलेला बॉल वाईड असूनही अंपायरने दिला नाही. या निर्णयावर निराश पोलार्डने हवेत त्याची बॅट भिरकावत ती पुन्हा झेलली. पुढच्याच चेंडूवर तो स्टंप पुढे आला आणि खेलपट्टीपासून काहीसा दूर गेला. त्याची ही कृती पाहून मैदानावरील दोन्ही पंच त्याचं हे वर्तन चुकीचं असल्याचं सांगण्यास आले. पण, पोलार्डही त्याच्या भूमिकेवर ठामच होता. त्यामुळे या एका घटनेनेही सामन्याला वेगळंच वळण दिलं होतं.


मुंबईची बॉलिंग सुरु असतानाही एका वाईड बॉलवरून लाईव्ह कॉमेंट्री करत असलेल्या इयन बिशप यांना माफी मागावी लागली. मुंबईच्या सहाव्या ओव्हरमध्ये लसिथ मलिंगाने शेन वॉटसनला बाऊन्सर टाकला. यानंतर शेन वॉटसनने इंग्रजीमध्ये शिवी दिली. स्टम्प मायक्रोफोनमध्ये ही शिवी स्पष्ट ऐकू आल्यामुळे इयन बिशप यांना ब्रॉडकास्टरच्या वतीने माफी मागावी लागली.