मुंबई : आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना पंजाबशी होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रात्री ८ वाजता मॅचला सुरुवात होईल. या मॅचआधी मुंबईच्या टीममध्ये मलिंगाचं पुनरागमन झालं आहे. श्रीलंकेहून परत आल्यानंतर मलिंगाला मंगळवारी नेटमध्ये सराव करताना पाहिल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिंगाने या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ३ मॅचमध्ये ३ विकेट घेतल्या आहेत. चेन्नईविरुद्धची मॅच खेळल्यानंतर मलिंगा श्रीलंकेमध्ये प्रथम श्रेणी स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. मलिंगा हा श्रीलंकेच्या वनडे टीमचा कर्णधार आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून श्रीलंकेतल्या युवा खेळाडूंची कामगिरी बघण्यासाठी मलिंगा ही स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.


चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये ३ विकेट घेतल्यानंतर १२ तासांमध्येच मलिंगाने त्याची टीम गेलकडून खेळताना ७ विकेट घेतल्या. गेल टीमचा कर्णधार असलेल्या मलिंगाने ३ मॅचमध्ये ८ विकेट घेतल्या. मलिंगाची टीम या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.


मलिंगाचं मुंबईच्या टीममध्ये पुनरागमन झालं असलं तरी त्याला कोणत्या खेळाडूच्या जागेवर संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कारण हैदराबादविरुद्धच्या मागच्या मॅचमध्ये मुंबईच्या अल्झारी जोसेफनं १२ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. आत्तापर्यंतच्या सगळ्या आयपीएल मोसमातली ही सर्वोत्तम कामगिरी होती. तर जेसन बेहरनडॉर्फ यानेही दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे.


पंजाबविरुद्धची ही मॅच खेळल्यानंतर लसिथ मलिंगा हा पुन्हा श्रीलंकेतल्या स्थानिक स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी रवाना होईल. या स्पर्धेची फायनल गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.