IPL 2019 : सगळ्यात महागड्या वरुण चक्रवर्तीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये २५ रन
आयपीएलच्या लिलावामध्ये वरुण चक्रवर्ती हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला.
कोलकाता : आयपीएलच्या लिलावामध्ये वरुण चक्रवर्ती हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. २० लाख रुपये बेस प्राईज असलेल्या वरुणला ४० पट जास्त म्हणजेच ८ कोटी ४० लाख रुपये मिळाले. पंजाबच्या टीमनं वरुण चक्रवर्तीवर एवढे पैसे खर्च केले. पण आपल्या आयपीएलच्या पहिल्याच मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने तब्बल २५ रन दिले.
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबने वरुण चक्रवर्तीला मैदानात उतरवलं. पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने वरुण चक्रवर्तीला मॅचमधली दुसरीच ओव्हर दिली. पण सुनिल नारायणने वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगचा चांगलाच समाचार घेतला. ओव्हरच्या पहिल्या बॉलला क्रिस लिनने एक रन काढून नारायणला स्ट्राईक दिला. यानंतर दुसऱ्या बॉलला नारायणने सिक्स मारली. तिसऱ्या बॉलवर नारायणने दोन रन काढून पुन्हा स्ट्राईक घेतला. चौथ्या बॉलवर त्याने फोर मारली, तर पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सिक्स मारली.
वरुण चक्रवर्तीचा प्रवास
सुरुवातीला मध्यम जलदगती बॉलर असणारा वरुण चक्रवर्ती नंतर स्पिनर बनला. गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे जलदगती बॉलरपासून स्पिनर बनण्याचा निर्णय घेतल्याचं, वरुण म्हणाला. आता वरुण चक्रवर्तीकडे ७ वेगवेगळ्या प्रकारचे बॉल आहेत.
२७ वर्षांच्या वरुण चक्रवर्तीनं तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये वरुणनं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत वरुणनं ९ मॅचमध्ये २२ विकेट घेतल्या होत्या.
वरुणनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये ४.७ च्या इकोनॉमी रेटनं ९ विकेट घेतल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण दुसरा यशस्वी बॉलर ठरला होता. वरुण याआधी टेनिस बॉलनं क्रिकेट खेळायचा. टेनीस बॉलच्या व्हेरियेशन्सचा प्रयोग त्यानं सिझन बॉल क्रिकेटमध्ये केला आणि यशस्वी झाला.
वरुण चक्रवर्तीनं त्याच्या क्रिकेटची सुरुवात शाळेपासूनच केली होती. पण अंडर-१७ आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यानं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वरुणनं ५ वर्ष आर्किटेक्चरचा कोर्स केला आणि एक वर्ष नोकरी केली. नोकरी करत असतानाच वरुणनं पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत काम करण्यात वरुणला रस नसल्यामुळे त्यानं पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. २५व्या वर्षी वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं.