हैदराबाद : रोहित शर्माची मुंबई आयपीएलच्या १२व्या मोसमाची चॅम्पियन ठरली. मुंबईने धोनीच्या चेन्नईचा शेवटच्या बॉलवर १ रनने पराभव केला. या पराभवानंतर धोनी आणि चेन्नईचे चाहते नाराज झाले. या मोसमात पाठीच्या दुखापतीमुळे धोनीला दोन मॅच खेळता आल्या नाहीत. यामुळे हा मोसम धोनीचा शेवटचा तर नाही ना? अशा चर्चा सुरु झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्ती घेईल, असं बोललं जातंय. पण धोनी आयपीएलचा पुढचा मोसम खेळेल का? असा प्रश्न होता. आयपीएलच्या फायनलनंतर कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी धोनीला हाच प्रश्न विचारला. तेव्हा पुढच्या मोसमात आपण खेळणार असल्याचे संकेत धोनीने दिले.


मुंबईविरुद्ध फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर धोनी म्हणाला, 'दोन्ही टीमकडून सारख्याच चुका झाल्या, पण ज्या टीमची एक चूक कमी झाली, तिचा विजय झाला. पुढच्या मोसमात मी खेळीन, अशी अपेक्षा आहे.'


याआधीही निवृत्तीबाबतच्या प्रश्नांवर धोनीने उत्तरं दिली आहेत. जोपर्यंत मी फिट आहे, तोपर्यंत खेळत राहिन, असं धोनी अनेकवेळा म्हणाला आहे. आयपीएलच्या १२व्या मोसमात धोनीने चेन्नईकडून सर्वाधिक रन केल्या. विकेट कीपिंग करताना धोनीची चपळताही या मोसमात अनेकवेळा दिसून आली.