IPL 2019: रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूला हरवलं
रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूचा पराभव केला आहे.
बंगळुरू : रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूचा पराभव केला आहे. याचबरोबर मुंबईने यंदाच्या आयपीएलमधलं विजयाचं खातं उघडलं आहे. विजयासाठी १८८ रनचा पाठलाग करताना बंगळुरूला २० ओव्हरमध्ये १८१/५ एवढाच स्कोअर करता आला. यामुळे मुंबईचा ६ रननी विजय झाला. एबी डिव्हिलियर्सनं ४१ बॉलमध्ये नाबाद ७० रनची खेळी केली. पण त्याला बंगळुरूला जिंकवता आलं नाही. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला आलेल्या बंगळुरूची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर मोईन अलीला रोहित शर्माने १३ रनवर आऊट केलं.
मोईन अलीची विकेट गेल्यानंतर विराट आणि पार्थिव आणि मग विराट आणि एबी डिव्हिलियर्सनं बंगळुरूचा फटकेबाजी सुरुच ठेवली. पार्थिव पटेलला मयंक मार्कंडेनं ३१ रनवर बोल्ड केलं. तर बुमराहनं विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. विराट कोहली ४६ रनवर आऊट झाला.
जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगाच्या शेवटच्या दोन ओव्हरमुळे मुंबईला विजय मिळवता आला. बुमराहने १९व्या ओव्हरमध्ये फक्त ५ रन दिले. तर मलिंगाने शेवटच्या ओव्हरमध्ये १० रन करून दिले. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर मयंक मार्कंडेला एक विकेट मिळाली.
या मॅचमध्ये बंगळुरूने टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगची संधी दिली. यानंतर मुंबईने २० ओव्हरमध्ये १८७/८ एवढा स्कोअर केला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (४८ रन) आणि क्विंटन डिकॉकने (२३रन) मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. ५४ रनवर मुंबईची पहिली विकेट पडली. पण यानंतर मुंबईची पडझड व्हायला सुरुवात झाली. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या युवराज सिंगने चहलच्या एका ओव्हरच्या पहिल्या तीन बॉलला सिक्स मारली. चौथ्या बॉलला सिक्स मारायच्या प्रयत्नामध्ये युवराज २३ रनवर आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने २४ बॉलमध्ये ३८ रनची खेळी केली.
मुंबईची टीम मोठी धावसंख्या उभारणार नाही असं वाटत असतानाच हार्दिक पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याने १४ बॉलमध्ये नाबाद ३२ रन केले.
बंगळुरूकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं.