मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईच्या टीमने त्यांच्या खेळाडूंमध्ये आणखी एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफऐवजी मुंबईने टीममध्ये ब्युरन हेन्ड्रीक्सला संधी दिली आहे. ब्युरन हेन्ड्रीक्स हा दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फास्ट बॉलर आहे. उरलेल्या मॅचमध्ये ब्युरन हेन्ड्रीक्स मुंबईकडून खेळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानविरुद्धच्या मुंबईत मॅचमध्ये अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली होती. सीमारेषेवर फोर अडवताना अल्झारी जोसेफचा खांदा निखळला. या दुखापतीमुळे जोसेफ संपूर्ण मोसमाला मुकणार आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ऍडम मिलने याच्याऐवजी अल्झारी जोसेफला मुंबईने संधी दिली होती. आयपीएलचा यंदाचा मोसम सुरू होण्याआधी ऍडम मिलने याने दुखापतीमुळे माघार घेतली होती. आपली पहिलीच मॅच खेळताना अल्झारी जोसेफने विक्रम केला होता. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये जोसेफने १२ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. आयपीएल इतिहासातली ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.


ब्युरन हेन्ड्रीक्स हा याआधी २०१५ साली पंजाबच्या टीमकडून आयपीएल खेळला होता. आयपीएलच्या ७ मॅचमध्ये हेन्ड्रीक्सने ९ विकेट घेतल्या आहेत. तर हेन्ड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेकडून २ वनडेमध्ये १ विकेट आणि १० टी-२० मॅचमध्ये १६ विकेट घेतल्या.


दरम्यान मुंबईचा आणखी एक डावखुरा फास्ट बॉलर जेसन बेहरनडॉर्फ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. बेहरनडॉर्फची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे. वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी कॅम्पचं आयोजन केलं आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २ मेपासून कॅम्पचं आयोजन केलं आहे. यासाठी बेहरनडॉर्फ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.


या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी बेहरनडॉर्फबरोबर हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर, राजस्थानचा स्टिव्ह स्मिथ आणि बंगळुरूचा मार्कस स्टॉयनिस रवाना होतील. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली मॅच १ जूनला अफगाणिस्तानबरोबर आहे.