मुंबई : मुंबईच्या टीमची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खराब झाली आहे. यंदाच्या मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला आहे. २१४ रनचा पाठलाग करताना मुंबईचा १७६ रनवर ऑल आऊट झाला. दिल्लीच्या मोठ्या आव्हानानंतर बॅटिंगला आलेल्या मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा फक्त १४ रन करून आऊट झाला. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईला वारंवार धक्के लागत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगने मात्र त्याचा संघर्ष सुरु ठेवला. ३५ बॉलमध्ये ५३ रन करून युवराज आऊट झाला. युवराजच्या खेळीमध्ये ५ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. कृणाल पांड्याने १५ बॉलमध्ये ३२ रनची खेळी केली. त्याने ५ फोर आणि १ सिक्स लगावली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४ ओव्हरमध्ये २३ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मालाही २ विकेट मिळाल्या. ट्रेन्ट बोल्ट, राहुल टेवटिया, किमो पॉल आणि अक्सर पटेलला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.


त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऋषभ पंतने २७ बॉलमध्ये नाबाद ७८ रनची खेळी केली, यामध्ये ७ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. पंतने तब्बल २८८.८९ च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. ऋषभ पंतने त्याचं अर्धशतक फक्त १८ बॉलमध्ये पूर्ण केलं होतं. पंतच्या या खेळीमुळे मुंबईला विजयासाठी २१४ रनचं आव्हान आहे.


या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईने सुरुवातीलाच दिल्लीला धक्के दिले. पृथ्वी शॉ (७ रन) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१६ रन) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या दोन विकेट गेल्यानंतर शिखर धवन (४३ रन) आणि कॉलीन इन्ग्राम (४७ रन) यांनी दिल्लीचा डाव सावरला. कॉलीन इन्ग्रामची विकेट गेल्यानंतर ऋषभ पंतने फटकेबाजी करून दिल्लीचा स्कोअर २००च्या पुढे नेला. जगातला नंबर एकचा फास्ट बॉलर असलेल्या जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवरही पंतने सिक्सची बरसात केली.


मुंबईकडून मिचेल मॅकलेनघनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि बेन कटिंगला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.