मुंबई : आयपीएलच्या ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या मॅचनंतर प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याचा पराभव झाला आणि त्यांचं प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं. सुरुवातीच्या ५ मॅचनंतर कोलकात्याची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती, पण शेवटच्या मॅचनंतर ते पाचव्या क्रमांकावर गेले. खराब कामगिरीनंतर कोलकात्याच्या खेळाडूंमधला तणाव वाढला होता, अशी प्रतिक्रिया कोलकात्याचे सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ मॅचपैकी ६ मॅचमध्ये कोलकात्याचा विजय झाला, तर ८ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे कोलकात्याच्या खात्यात १२ पॉईंट्स जमा झाले. हैदराबादची टीमही १२ पॉईंट्ससह प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला, पण हैदराबादचा नेट रनरेट कोलकात्यापेक्षा चांगला असल्यामुळे ते प्ले-ऑफमध्ये गेले.


यंदाच्या आयपीएलमधल्या खराब कामगिरीनंतर सायमन कॅटिच म्हणाला, 'आमच्या टीमने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण यानंतर लागोपाठ ६ मॅचमध्ये आमचा पराभव झाला. यामुळे टीममधला तणाव वाढला. मी हे सत्य लपवू शकत नाही, पण खेळाडूंमधला तणाव वाढला होता.' कोलकात्याकडून वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने सर्वाधिक ५१० रन केले.


'आम्हाला या समस्येचं निराकरण एकत्र बैठक घेऊन करावं लागणार आहे. आमच्यासाठी एकता सगळ्यात महत्त्वाची आहे. कोलकात्याच्या टीमची ओळखही अशीच आहे. याचा आम्हाला गर्व आहे,' असं वक्तव्य कॅटिचने केलं.


आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये मुंबई, चेन्नई आणि दिल्लीचा १८ पॉईंट्ससह आणि हैदराबादचा १२ अंकांसह प्रवेश झाला. आता ७ मेरोजी मुंबईचा सामना चेन्नईशी होणार आहे. पंजाबची टीम १२ पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर, राजस्थान आणि बंगळुरूच्या टीम ११ पॉईंट्सह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर राहिल्या.