मुंबई : क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचं यंदाचं पर्व आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. अनेक संघ आणि तितक्याच पट्टीच्या खेळाडूंची प्रतिष्ठा यंदाच्या आयपीएलमध्ये पणाला लागली होती. काहींनी आपल्या कौशल्याच्या बळावर संघाची कामगिरी यशाच्या मार्गाने नेली, तर काहींना मात्र यात अपयश आलं. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मैदानावर उतरणारा बंगळुरूचा संघही त्यातीलच एक. यंदाचा आयपीएलचा हंगाम बंगळुरूच्या संघासाठी फारसा चांगला राहिला नाही. सामन्यांच्या माध्यमातून याची वारंवार प्रचितीही आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे संघाच्या वाट्याला अपयश आलेलं असतानाही, दुसरीकडे चाहत्यांनी या संघाला पाठिंबा देण्यात कोणतीत कमतरता पडू दिली नाही. अशा चाहत्यांचे, मैदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि संघासाठी लहानमोठ्या प्रतीचं योगदान देणाऱ्या प्रत्येकाचेच विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काहींची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. संघाच्या वाट्याला अपयशाप्रती त्याने एक प्रकारे दिलगिरीच व्यक्त केली. 


विराटच्या याच पोस्टवर एकेकाळी याच संघाची मालकी असणाऱ्या आणि सध्याच्या घडीला कर्जबुडवेपणा करत देशाबाहेर पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याने ट्विट करत विराटच्या या पोस्टला आणि बंगळुरूच्या संघाला निशाण्यावर घेतलं आहे. 'यांची आखणी नेहमीच सर्वोत्तम असते, पण दुर्दैवाने तीसुद्धा फक्त कागदोपत्री', असं लिहित त्याने संघाचा उल्लेख 'wooden spoon' म्हणून केला. याच ट्विटमध्ये त्याने विराटच्या पोस्टची लिंकही जोडली. 



मल्ल्याचं हे ट्विट पाहता, चोराच्या उलट्या बोंबा अशीच प्रतिक्रिया बंगळुरू संघाच्या समर्थकांनी दिली आहे. एकिकडे संघाला चाहत्यांची मिळणारी साथ आणि त्याचवेळी मल्ल्यासारख्यांकडून मानसिक खच्चीकरण करणारं हे ट्विट पाहता, विराट यावर त्याच्या शैलीत काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.