IPL 2020: गौतम गंभीरच्या मते, पहिल्या सामन्यात या संघाची बाजू मजबूत
मुंबई आणि चेन्नई मध्ये रंगणार पहिला IPL 2020 चा सामना...
मुंबई : आयपीएल सीझन 13 (IPL 2020) चे काउंटडाउन जवळ येत आहे. आयपीएल २०२० चा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी अबूधाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) या दोन लीगमधील मजबूत संघांमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, सीएसके आणि एमआयच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सची बाजू मजबूत असल्याची टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने म्हटलं आहे. आयपीएलच्या या पहिल्या सामन्यात गंभीरने मुंबईला पंसती दिली आहे.
बुमराह आणि बोल्ट
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात नाही आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट मुंबई संघात मलिंगाची जागा भरुन काढणार आहे. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील त्याच्या सोबत दुसरी बाजू सांभाळणार आहे. बोल्ट आणि बुमराहची जोडी मुंबई इंडियन्सकडून मैदानावर विरुद्ध टिमला कमीत कमी रनवर आऊट करण्यासाठी प्रयत्न करेल. गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात एमआयचा संघ मजबूत असल्याचं म्हटलं आहे. एका टीव्ही शो दरम्यान गौतम गंभीरने म्हटले की, जसप्रीत बुमराह आणि बोल्ड या वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. सर्वांना ठाऊक आहे की या क्षणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये या दोघांचा समावेश होतो. तसेच टी -20 क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचीही दोघांची खास कला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबईची बाजू अधिक भक्कम आहे.
सुरेश रैनाची अनुपस्थिती
गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाची अनुपस्थिती चेन्नई संघाला जाणवणार आहे. गौतम गंभीरने मुंबईला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) च्या पुढे ठेवले आहे. रैना नसल्यामुळे सीएसकेच्या टीमला बर्याच अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. कारण रैनामध्ये बुमराह आणि बोल्ट सारख्या गोलंदाजांसमोर उभे राहण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत रैनाच्या अनुपस्थितीत सीएसके (चेन्नई सुपर किंग्ज) कडून तिसऱ्या स्थानावर कोण फंलदाजी करेल असा प्रश्न आहे.