आयपीएलमध्ये `नो बॉल`वरून राडा होणार नाही, बीसीसीआयने नियम बदलले
बीसीसीआयच्या मुख्यालयात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक झाली.
मुंबई : बीसीसीआयच्या मुख्यालयात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत आयपीएलमध्ये पॉवर प्लेयरचा नियम आणण्याबाबत विचार करण्यात आला, पण याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. तर नो बॉलचा नियम मात्र बदलण्यात आला आहे. नो बॉल देण्यासाठी अतिरिक्त अंपायर ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे २०२० सालच्या आयपीएलमध्ये नो बॉल देण्यासाठी वेगळा अंपायर दिसू शकतो.
'आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करु इच्छितो. नो बॉलची देखरेख ठेवण्यासाठी आम्ही अंपायर ठेवू. नो बॉल बघणारा अंपायर असेल, तर थर्ड आणि फोर्थ अंपायर असणार नाही,' अशी प्रतिक्रिया आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली. १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होईल, असंही पटेल यांनी सांगितलं. जर सगळं व्यवस्थित पार पडलं, तर २०२० च्या मोसमात नो बॉल पाहण्यासाठी एक अतिरिक्त अंपायर असेल, असं बीसीसीआयचा एक अधिकारी ही बैठक संपल्यानंतर म्हणाला.
पॉवर प्लेयरच्या नियमाबाबत मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, पण या नियमावर भविष्यात विचार केला जाईल. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत या नियमाचा वापर करणं योग्य ठरलं असतं, पण आता याची शक्यता कमी आहे. आयपीएलमध्ये याचा प्रयोग करण्याआधी आम्हाला यावर आणखी चर्चा करावी लागेल, असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलं.
मागच्या वर्षी आयपीएलमध्ये नो बॉलमुळे बराच वाद झाला होता. मुंबई आणि बंगळुरुच्या अटीतटीच्या मॅचमध्ये मलिंगाने मॅचचा शेवटचा बॉल नो बॉल टाकला, पण अंपायरने तो नो बॉल दिलाच नाही, यामुळे मुंबईचा विजय झाला. यानंतर विराट कोहलीही अंपायरवर चांगलाच भडकला. राजस्थान आणि चेन्नईच्या मॅचवेळीही नो बॉलचा असाच वाद झाला होता. या मॅचमध्ये तर नो बॉलच्या वादातून कायमच शांत असणारा धोनी संतापून मैदानामध्ये आला आणि त्याने अंपायरशी हुज्जत घातली.