मुंबई : काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी चेन्नईच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठ्या अनोख्या अंदाजात चेन्नई गाठलं होतं. माहिने IPL आयपीएलसाठीचा सरावही सुरु केला होता. त्याच्या नुसत्या येण्यानेच चेन्नईमध्ये हर्षोल्हासाचं वातावरण पाहायला मिळत होतं. क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी म्हणून क्रीडारसिक संघाच्या सराव सत्रांनाही हजेरी लावू लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा हंगाम नजीक येत असतानाच उत्साही वातावरणाला गालबोट लागलं आणि माहिने चेन्नईला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसची साऱ्या जगभरात असणारी दहशत पाहता २०२० या वर्षी होणारी आयपीएल ही बहुप्रतिक्षित स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर माहीने चेन्नईतून निघण्याचा निर्णय घेतला. 


चेन्नईतून निघतेवेळी त्याने काही चाहत्यांची भेटही घेतली. कोणाशी गप्पा मारत, कोणाला सही देत तर कोणासोबत सेल्फी काढत धोनीने शक्य त्या सर्व चाहत्यांकडे त्याची आठवण सोडली आहे. मुख्य म्हणजे चेन्नई आणि धोनीचं एक खास नातं आहे. अनेकदा या नात्याची प्रतिचीही आली आहे. त्याला तिथे धोनी या नावापेक्षा थाला म्हणूनच जास्त ओळखलं जातं. 


असा हा थाला चेन्नईतून निघताना एका नव्या लूकमध्ये दिसला. निघण्याआधी अनेकांचीच भेट घेणाऱ्या धोनीने हटके लूक म्हणून चक्क 'फ्रेंच कट' प्रकारची दाढी ठेवली आहे. हा लूकही धोनीला शोभून दिसत आहे. त्यामुळे 'थाला' या नव्या लूकमध्येही कमाल करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता बीसीसीआयकडूनही क्रिकेट स्पर्धा रद्द करत, काही स्पर्धांना तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. याच धर्तीवर घेण्यात आलेले हे निर्णय पाहता आयपीएलचं भवितव्य काय असणार हेसुद्धा पुढील काही दिवसांमधील कोरोनाची परिस्थिती ठरवणार आहे.