मुंबई : आयपीएलच्या भवितव्याचा फैसला उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल किंवा इतर मोठे कार्यक्रम घ्यायचे का नाही, याबाबत निर्णय उद्याच्या बैठकीत होईल, असं वक्तव्य टोपे यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. बुधवारपासून व्यापक पद्धतीने जनजागृती करण्यात येणार आहे. पोस्टर, वर्तमानपत्र, वृत्तवाहिनी, चित्रपटगृह यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात उद्या तातडीची बैठकही बोलावली आहे. मंत्रालयात दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह मुंबईतील काही तज्ज्ञ डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना आणि जनजागृती यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.


कोरोनामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातल्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, कर्नाटक सरकारने आयपीएल रद्द करावं किंवा पुढे ढकलावं, या मागणीचं पत्र केंद्र सरकारला केलं आहे. आता महाराष्ट्रातही आयपीएलवर संकट ओढावलं आहे.


२९ मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. एकीकडे आयपीएल रद्द करण्याची मागणी होत असताना बीसीसीआयने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. आयपीएलला अजून बराच कालावधी बाकी आहे. आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.