दुबई : आयपीएल २०२० च्या तिसर्‍या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद पुढे आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे. हैदराबादची कमान डेव्हिड वॉर्नरकडे आहे तर आरसीबीची विराट कोहलीकडे. या मोसमात आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत, जे खूपच रोमांचक ठरले आहेत, अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात ही चाहत्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा एक यशस्वी कर्णधार विराट कोहली आरसीबीचं नेतृत्व करत असताना कप जिंकण्यात मात्र आतापर्यंत अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत विराट आणि कंपनीचे लक्ष्य यंदा कप जिंकणं हाच आहे. गेल्या तीन सत्रात बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. अशा परिस्थितीत आरसीबी समोर दबाव असेल आणि पहिला सामना जिंकून मनोबल वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे हैदराबादचा संघ संतुलित आहे आणि आजचा सामना जिंकून त्यांना स्पर्धेत विजयी सुरुवात करायला आवडेल.


आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 वेळा हे दोन संघ समोरासमोर आले आहेत, त्यामध्ये आरसीबीने 6 तर हैदराबादने 8 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याच वेळी, एका सामन्याचा निकाल अनिर्णायक ठरला होता.


दोन्ही संघांमध्ये स्फोटक फलंदाजांची कमतरता नाहीये. बंगळुरूच्या संघात कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच आहे, तर हैदराबादच्या संघात डेव्हिड वॉर्नर, फेबियन एलेन, केन विल्यमसन आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे.


गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भुवनेश्वर कुमार हैदराबादकडून वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी संदीप शर्मा, सिद्धार्थ आणि थंपीसारखे गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये मोहम्मद नबी आणि राशिद खान सारख्या अव्वल गोलंदाजांचा समावेश आहे. आरसीबीकडे फिरकी गोलंदाजीतही चांगले पर्याय आहेत. लेगस्पिनर युजवेंद्र चहल व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, अ‍ॅडम जंपा आणि मोईन अली हे अनुभवी गोलंदाज संघात आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि डेल स्टेन संघात आहेत.