दुबई : १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये यंदाच्या मोसमातला पहिला सामना होणार आहे. मुंबईकडून यंदा ओपनिंगला कोण खेळणार? हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. या प्रश्नावर खुद्द रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे. स्पर्धा सुरु व्हायच्या आधी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्मा आणि मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धने आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमसाठी सगळे पर्याय खुले असले, तरी मी ओपनिंगला खेळणार असल्याचं रोहित शर्माने स्पष्ट केलं. 'मागच्या संपूर्ण मोसमात मी ओपनिंगला खेळलो, यंदाही तेच करणार आहे. टीमला जे हवं आहे, ते मी करीन. वरच्या फळीत खेळायला मला आवडतं, बराच काळ मी तेच करत आहे. भारतासाठी खेळतानाही मी टीमला सगळे पर्याय खुले ठेवायला सांगतो. इकडेही मी तेच करणार आहे,' असं रोहित म्हणाला.


रोहित शर्मासोबत क्विंटन डिकॉक ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे क्रिस लिनला संधी मिळणार नाही. क्रिस लिनला मुंबईने त्याची बेस प्राईज २ कोटी रुपयांना लिलावात विकत घेतलं होतं. नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रिमियर लीगमधल्या संथ खेळपट्ट्यांवर लिनला चमकदार कामगिरी करता आली नाही. सेंट किट्स ऍण्ड नेव्हीस पॅट्रिअट्सकडून खेळताना लिनने १७.२५ च्या सरासरीने १३८ रन केले, यामध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर ३४ होता. 


'लिनचं टीममध्ये येणं हे मस्तच आहे, पण रोहित आणि क्विंटनने मागच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली. दोघंही सातत्यपूर्ण कामगिरी करतात आणि दोघांकडे अनुभव आहे. तसंच दोघंही चांगलं नेतृत्व करतात. त्यामुळे न तुटलेल्या गोष्टी जोडण्याची गरज काय? आहे त्यासोबतच आम्ही पुढे जाणार आहोत,' असं टीमचे प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले. 


'लिनमुळे आम्हाला लवचिकता मिळाली आहे, ज्यासाठी आम्ही नेहमीच आग्रही असतो. टीमला जास्त पर्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो, त्यामुळे आम्ही मोठ्या मॅचमध्ये वेगळाच निर्णय घेऊ शकतो. रोहित आणि क्विंटन या जोडीने सर्वोत्तम कामगिरी केली आहे,' अशी प्रतिक्रिया जयवर्धनेनी दिली. 


मुंबईची टीम यंदा लसिथ मलिंगाशिवाय मैदानात उतरणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलिंगाऐवजी मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिनसनला टीममध्ये घेतलं आहे. 


मुंबईची टीम


रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, मिचल मॅकलॅनघन, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिनसन, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, राहुल चहर, इशान किशन, अनुकूल रॉय, आदित्य तरे, जयंत यादव, ट्रेन्ट बोल्ट, धवल कुलकर्णी, शरफेन रदरफोर्ड, क्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय


IPL 2020 : मुंबईच्या सगळ्या मॅचचं वेळापत्रक