दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात राजस्थान रॉयल्सचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात इतिहास रचला. राजस्थानने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 224 धावांचा पाठलाग करत आयपीएलच्या इतिहासात 226 धावा करत मोठा विजय मिळविला होता. पहिल्या सामन्यात कोलकाताचा पराभव झाला होता. दुसर्‍या सामन्यात मात्र त्यांनी हैदराबादला शानदार कामगिरी करत पराभूत केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमधील विजयाची मालिका सुरु ठेवायची असेल तर त्यांना या सामन्यात सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये चालणार्‍या राजस्थान रॉयल्सचा पराभव करावा लागेल.


राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर या संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया सारखे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. संजू सॅमसन, कॅप्टन स्टीव्ह स्मिथ यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळली. सॅमसनने 85 धावाकेल्या होत्या आणि कर्णधार स्मिथने 50 धावा केल्या होत्या. आलराउंडर तेवतियाने पंजाब विरुद्ध 31 बॉलमध्ये 53 रन करत विजय खेचून आणला होता.


सलामीवीर जोस बटलरकडून राजस्थानला मोठ्या खेळाची अपेक्षा असणार आहे. रॉबिन उथप्पाकडून ही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. फलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये संघ निश्चितपणे बदल करु शकतो. अंकित राजपूत आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश राहू शकतो.


केकेआरला रॉयल्सशी सामना करण्यासाठी त्यांचा सर्वात मोठा स्टार खेळाडू आंद्रे रसेल आणि इयन मॉर्गनला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.


शेवटच्या सामन्यात कोलकातासाठी चांगली गोष्ट म्हणजे पॅट कमिन्सने आपली उपयुक्तता सिद्ध केली. पहिल्या सामन्यात अधिक रन दिल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. दुसर्‍या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. युवा शिवम मावीने आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. कमलेश नागरकोटी आणि आंद्रे रसेल देखील संघासाठी उपयुक्त खेळी करु शकतील.


कुलदीप यादव आणि सुनील नारायण यांच्या व्यतिरिक्त वरुण चक्रवर्ती यांनाही फिरकीची संधी मिळाली. कोलकाताने मागील सामन्यात एक अतिरिक्त गोलंदाज खेळवला होता. आता या सामन्यातही ते समान रणनीती अवलंबतात का हे पाहवं लागेल.