मुंबई : अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच १९  सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या IPL 2020 आयपीएल या क्रिकेटच्या महाकुंभाची उत्सुकता कोरोनाचं सावट असतानाही शिगेला पोहोचली आहे. सर्व सावधगिरी बाळगत खेळाडू IPL च्या तयारीला लागले आहेत. आयपीएल म्हटलं की क्रीडा रसिकांसोबतच मनोरंजनाच्या दृष्टीनं येणाऱ्या प्रेक्षकांनाही याबाबतच कमालीचं कुतूहल असतं. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे खेळाडू चर्चेचा विषय ठरतात, त्याचप्रमाणे समालोचक अर्था कॉमेंट्रेटरसुद्धा तितक्याच आकर्षणाचा विषय ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमेंट्री पॅनलची घोषणा करत ऑफिशिअल ब्रॉडकास्टर असणाऱ्या स्टार स्पोर्ट्सनं हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषांची यादी जाहीर केली आहे. या कॉमेंट्री पॅनलमध्ये बऱ्याच दिग्गज खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. पण, एक लोकप्रिय नाव मात्र यात कुठेच दिसत नाहीय. 


इंग्रजी समालोचकांच्यां यादीत सुनील गावस्कर, हर्षा भोगले, कुमार संगकारा, इयान बिशप, केवीन पीटरसन यांसोबतच इतरही काही प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. त्याशिवाय या यादीत लीसा स्थालेकर आणि अंजुम चोप्रा या महिला कमेंटेटरच्या नावाचाही समावेश आहे. पण, संजय मांजरेकर यांचं नाव मात्र कुठेच नाही. 


२००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून मांजरेकर कॉमेंट्री टीमचा भाग होते. पण, यंदाच्या वर्षी मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. 


इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी कॉ़मेंट्रीच्या पॅनलमध्ये आकाश चोप्रा, इरफान पठाण, आशिष नेहरा, संजय बांगर आणि यांच्यासह इतरही समालोचकांचा समावेश आहे. तर, भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीमध्ये काम केलेले श्रीकांत हे तामिश आणि एम.एस.के. प्रसाद हे तेलुगूमध्ये कॉमेंट्री करताना दिसतील. 


 


हिंदी कॉमेंट्री पॅनल- 


आकाश चोप्रा, इरफान पठान, आशिष नेहरा, जतिन सप्रू, निखिल चोप्रा, किरण मोरे, अजित आगरकर, संजय बांगर 


इंग्रजी कॉमेंट्री पॅनल- 


इयान बिशप, सायमन डोल, कुमार संगकारा, हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रोहन गावस्कर, दीप दासगुप्ता, शिवा रामाकृष्णन, अंजुम चोप्रा, मुरली कार्तिक, मार्क निकोलस, केवीन पीटरसन, जेपी ड्यूमिनी, लिसा स्थेलकर, डेरेन गंगा, पोमी बांगवा, मायकल स्लेटर आणि डैनी मॉरिसन.


डगआऊट कॉमेंटेटर्सची यादी-


डीन जोन्स, स्कॉट स्टायरिस, ब्रायन लारा, ब्रेट ली, ग्रीम स्वान