IPL 2021: ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अडचणीत वाढ, होऊ शकतो दंड किंवा 5 वर्षांच्या तुरुंगवास
वाढत्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू IPL सोडून स्वदेशी परतले आहेत. तर काही खेळाडू अजूनही IPL खेळत आहेत.
मुंबई: वाढत्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू IPL सोडून स्वदेशी परतले आहेत. तर काही खेळाडू अजूनही IPL खेळत आहेत. हे खेळाडू स्वदेशी कसे जाणार यावरून गेले काही दिवस चर्चा सुरू आहेत. याच चर्चेदरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मायदेशी परत जाताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या अहवालानुसार खेळाडूंना एकतर दंड आकारण्यात येईल किंवा 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश करणाऱ्यांना दंड आकारण्यात येईल किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच फेडरल सरकार फतवा काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे IPLमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये 66000 डॉलर्स दंड किंवा 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. 36000 ऑस्ट्रेलियाचे नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. तर 9000 ऑस्ट्रेलियाचे नागरिक भारतात आहेत. त्यापैकी काही खेळाडू आणि कोच स्टाफ, अंपायर्स IPLमध्ये देखील आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस यांनी यापूर्वी सांगितलं आहे की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांची व्यवस्था करावी. ऑस्ट्रेलिया सरकारकडून कोणतीही मदत त्यांना होणार नाही. त्यामुळे हे खेळाडू अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत.