IPL2021: पराभवानंतर CSKला मोठा दणका, धोनीला भरावा लागणार 12 लाखांचा दंड
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला
मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्याची तुफान चर्चा आहे. गुरूसमोर शिष्य पहिल्या सामन्यात जिंकला. युवा जोश असलेला दिल्ली कॅपिटल्स संघानं CSKवर विजय मिळवला. CSK संघाने 189 धावांचं लक्ष्य दिलं असताना दिल्लीनं 190 धावा पूर्ण केल्या. महेंद्र सिंह धोनी आणि CSK संघासाठी देखील पहिला सामना पराभूत झाल्यानं वाईट वाटलं.
पराभवानंतर CSK संघाला मोठा दणका बसला आहे. IPLसाठी BCCIनं दिलेल्या नव्या नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी कर्णधार धोनीला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. BCCIच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला 90 मिनिटं सामना खेळण्यासाठी देण्यात आली आहेत. त्यानिमानुसार प्रत्येक ओव्हरला देखील ठरवून दिलेला वेळ आहे. प्रत्येक संघाने आपले 20 ओव्हर 90 मिनिटांत पूर्ण करणं अपेक्षित आहे. 90 मिनिटांत संघांना अडीच मिनिटांत दोनदा वेळ मिळेल. म्हणजेच संघांना 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर खेळावे लागतील. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.11 ओव्हरमध्ये खेळणं बंधनकारक आहे.
या नव्या नियमाचं CSK संघाकडून पहिल्याच सामन्यात उल्लंघन झालं. त्याचा फटका संघाला बसला असून कर्णधार धोनीला 12 लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी धोनीच्या संघाला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
आज IPLच्या चौदाव्या हंगामातील तिसरा सामना होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.