IPL 2021: IPLमध्ये उद्यापासून डबल धमाका; प्लेऑफच्या रेसमध्ये `हा` संघ येऊ शकतो पहिला
आता शनिवारपासून डबल हेडर सामने सुरू होणार आहेत.
मुंबई : IPL 2021चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. परंतु आता शनिवारपासून डबल हेडर सामने सुरू होणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी अबुधाबीमध्ये दुपारी 3.30 वाजता होईल. दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल आहे. जर संघाने राजस्थानविरुद्धचा सामना जिंकला, तर तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. दिल्लीच्या संघाने गेल्या मोसमातही अंतिम फेरी गाठली होती, पण मुंबई इंडियन्सकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे संघ पहिल्या विजेतेपदाची वाट पाहत आहे.
सध्याच्या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीने 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. संघाचे 14 गुण आहेत. दुसरीकडे, जर आपण राजस्थानबद्दल बोललो तर संघाने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. शेवटच्या सामन्यात संघाने पंजाब किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. राजस्थानने 2008 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यानंतर संघ कधीही चॅम्पियन बनू शकला नाही.
दिल्ली संघाने आयपीएलचे जेतेपद एकदाही पटकावले नाही. पण चालू हंगामात त्याच्या फलंदाज आणि गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे. फलंदाज शिखर धवनने 9 सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 422 धावा केल्या आहेत. 3 अर्धशतके केली आहेत. स्पर्धेतील इतर कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत 400 धावांचा टप्पा गाठला नाही.
पृथ्वी शॉने 319 आणि कर्णधार ऋषभ पंतने 248 धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 11 बळी घेतले आहेत. पहिल्या सामन्यात एनरिक नोरखियाने 2 बळी घेतले.
राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत कोणताही फलंदाज 300 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 281 धावा केल्या आहेत. मात्र, शेवटच्या सामन्यात महिपाल लेमोर, एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी आपला चांगला खेळ दाखवला. गोलंदाजीमध्ये ख्रिस मॉरिसने 14 बळी घेतले आहेत. तर युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने पंजाबच्या फलंदाजांना शेवटच्या सामन्यात शेवटच्या षटकात 4 धावा करू दिल्या नाहीत.